चीनने एक मूल हे वादग्रस्त धोरण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तीन दशकांनंतर सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या देशातील दाम्पत्यांना दोन मुलांना जन्म देण्यास परवानगी देण्यात आली आहे. चीनच्या या निर्णयामुळे जागतिक परिणाम होण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहे.
चीनने एक-मूल हे धोरण रद्द केल्याची माहिती झिनुहा या अधिकृत वृत्तसंस्थेने दिली आहे. चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाची चार दिवसांची प्रदीर्घ बैठक गुरुवारी संपली. या बैठकीत पुढील पाच वर्षांसाठी कुटुंबनियोजनाचा निर्णय घेण्यात आला.
या धोरणामुळे चीनमधील अनेक महिलांना गर्भपात करावा लागत होता. त्यामुळे या धोरणाला उजव्या विचारसरणीच्या गटाने आणि कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला होता. मात्र, या नव्या निर्णयामुळे चीनमधील दाम्पत्याला दोन आपत्यांना जन्म देता येईल. वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी चीनने १९७० मध्ये कुटुंबनियोजन धोरण जाहीर केले होते. शहरी भागातील दाम्पत्यांना एकाच आपत्याची परवानगी होती. तर ग्रामीण भागात दोन आपत्यांना जन्म दिला जात असे. पहिले आपत्य मुलगी असेल तरच दुसऱ्या आपत्यास परवानगी दिली जात होती. जगातील दुसरी आर्थिक महासत्ता असलेल्या चीनची लोकसंख्या १.३ अब्ज आहे.