चीनच्या हुबेई प्रांतात यांगत्से या नदीत वादळाने क्रूझ बोट बुडून ४५० जणांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यांगत्से ही आशियातील सर्वात मोठी नदी मानली जाते. या जहाजात एकूण ४५८ जण होते. शेकडो लोक बेपत्ता असून आतापर्यंत पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत. चार मजली ईस्टर्न स्टार शिप पूर्व चीनच्या नानजिंग येथून स्थानिक प्रमाणवेळेनुसार गुरुवारी दुपारी सव्वा वाजता निघाले. ते चोक्विंगकडे जात होते. प्रवास चालू झाल्यानंतर काही तासातच वादळ आले व एक ते दोन मिनिटातच जहाज जिलानी येथे बुडाले, असे जहाजाच्या कप्तानाने सांगितले. तो या दुर्घटनेत वाचला आहे. मुख्य अभियंताही या दुर्घटनेत वाचला आहे. 

आतापर्यंत चौदा जणांना वाचवण्यात यश आले असून पाच जण मरण पावल्याचे निश्चित झाले आहे. एकूण ४३९ जण अजून बेपत्ता आहेत व यांगत्से नदी ६३०० कि.मी. लांब असून ती आशियातील सर्वात मोठी नदी आहे. चीन सरकारने उलटलेल्या जहाजात ऑक्सिजन सोडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे काही जण जिवंत राहतील अशी आशा आहे. सीसीटीव्हीने या महाकाय जहाजाचा उलटलेला नांगर दाखवला. पंतप्रधान ली केक्वियांग घटनास्थळी गेले असून अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी राज्याच्या मंत्रिमंडळ सदस्यांना मदतकार्यावर देखरेख करण्यास सांगितले आहे. जहाज बुडाल्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही पण कॅप्टन व मुख्य अभियंता यांनी दिलेल्या माहितीनुसार जहाज चक्रीवादळात सापडून बुडाले. ही घटना इतकी पटकन घडली की जहाजाच्या कप्तानाला अडचणीत असल्याचा संदेश पाठवण्याचीही उसंतही मिळाली नाही. हे क्रूझ जहाज ७६ मीटर लांब असून त्यात ४०६ प्रवासी व ४७ कर्मचारी होते. पोलिस, तटरक्षक दल व अग्निशमन दलाचे अधिकारी मदतकार्य करीत असून एकूण ३६ जहाजे तेथे पाठवण्यात आली आहेत. इतर ११७ बोटीही मदतकार्यात सहभागी झाल्या आहेत.