सरकारकडून अधिकृत निवेदन नाही

नवी दिल्ली :चीनच्या १०० सैनिकांनी ३० ऑगस्टला उत्तराखंडमधील बाराहोटी येथून घुसखोरी केली, असे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे. अज्ञात सरकारी व सुरक्षा अधिकाऱ्यांनी ही माहिती दिल्याचे त्यात म्हटले आहे. चीनचे सैनिक टून जून ला भागातून पाच किलोमीटर आतपर्यंत भारतीय प्रदेशात घुसले असे सांगण्यात येते. सरकारने यावर अधिकृत असे कुठलेही निवेदन केलेले नाही.

चिनी सैनिकांनी या भागातील, पूल व इतर पायाभूत सुविधांचे नुकसान केले. नंतर भारतीय सैन्याचे गस्ती पथक व इंडो तिबेट सीमा पोलिसांचे पथक तेथे पोहोचले, त्यानंतर ही घुसखोरी केलेले चिनी सैनिक परत गेले. चिनी सैनिकांनी त्यांच्याबरोबर ५५ घोडे आणले होते. ते बराच काळ म्हणजे तीन तासांहून अधिक काळ तेथे होते असे समजते. बाराहोटी हा भाग नंदादेवी नॅशनल पार्क या उत्तर प्रदेशातील ठिकाणाच्या उत्तरेला आहे. तो जोशीमठ जिल्ह्य़ाला जोडलेला आहे. इंडो- तिबेट सीमा पोलिसांची या ३५० कि.मीच्या पट्टय़ात भारत-चीन दरम्यान सीमेवर उत्तराखंडमध्ये गस्त असते.

स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात घुसखोरी झाली होती. त्यानंतर लष्कर व इंडो-तिबेट पोलिस दलाचे गस्ती पथक तेथे आले व त्यांनी ही घुसखोरी करणाऱ्या सैनिकांना परतवून लावले. बाराहोटी हा निर्लष्करी भाग असून तेथे आता सुरक्षा चिंता वाढल्या आहेत. यापूर्वीही पीपल्स लिबरेशन आर्मीने बाराहोटीत घुसखोरीचा प्रयत्न केला होता, असे अज्ञात सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटले होते. दरम्यान गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले,की भारत व चीन यांच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आकलनाबाबत वाद आहेत, त्यामुळे अनेकदा घुसखोरी झालेली आहे. दोन्ही देशातील सीमा आखलेल्या नाहीत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा हजारो किलोमीटर असून ती लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत पसरलेली आहे. अलीकडे दोन्ही देशातील सैनिकांनी सीमेवरून माघार घेतली होती.

अनेक संघर्ष बिंदूवरून माघार घेण्यात आली आहे. भारत व चीन यांच्यात मे २०२०पासून संघर्ष सुरू असून चिनी सैन्याची त्या वेळी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अनेक ठिकाणी भारतीय सैन्याशी चकमक झाली होती. दोन्ही देशात गलवान येथे १५ जुलै २०२० रोजी चकमक झाली होती. त्यात वीस भारतीय जवान हुतात्मा झाले होते. दोन देशात आतापर्यंत लष्करी व राजनैतिक पातळीवर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असून भारत व चीन यांनी यावर्षी फेब्रुवारीत पँगॉग त्सो या पूर्व लडाखमधील भागातून माघार घेतली होती. ३१ जुलैला कमांडर पातळीवर चर्चा झाल्यानंतर गोग्रा भागातूनही माघार घेण्यात आली होती.