वाशी येथील हॉटेल फोर्थ पॉइंट आणि इनऑर्बिट मॉलसमोरील बळकावलेली ५,४९० चौरस मीटर मोकळी जागा परत करण्याबाबत सिडकोने के. रहेजा कॉर्पोरेशनला दिलेले आदेश दोन आठवडे ‘जैसे थे’ ठेवण्याचे उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. त्यामुळे कंपनीला दोन आठवडय़ांचा दिलासा मिळाला आहे.
न्यायमूर्ती वासंती नाईक आणि न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठासमोर या कंपनीच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने हे आदेश दिले. त्यामुळे या प्रकरणी दोन आठवडय़ांनी सुनावणी होणार आहे.
गुरुवारच्या सुनावणीत न्यायालयाने सिडकोच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. मात्र आपल्या याचिकेवर पुढील आठवडय़ात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याची बाब कंपनीकडून न्यायालयाला सांगण्यात आली. तसेच जागा नियमित करण्यासाठी दिलेली मुदतही अद्याप संपलेली नसल्याचेही सांगण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने सिडकोचा आदेश दोन आठवडे ‘जैसे थे’ ठेवण्याचे स्पष्ट केले. सिडकोच्या आदेशानुसार कंपनीला जागा परत करण्याची मुदत सोमवारी संपत आहे.
हॉटेल फोर्थ पॉइंट आणि इनऑर्बिट मॉल यांच्यासमोर जागा के. रहेजाने बळकावल्याबाबतची बाब संदीप ठाकूर यांनी केलेल्या याचिकेनंतर उघड झाली होती. त्यानंतर सिडकोने फेब्रुवारी २०१३ मध्ये कंपनीला ही जागा परत करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात कंपनीने न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सिडकोने दिलेले आदेश कायद्याच्या चौकटीत नसल्याचे स्पष्ट करीत न्यायालयाने कंपनी आणि ठाकूर यांचे म्हणणे ऐकल्यानंतर नव्याने निर्णय देण्याचे स्पष्ट केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jan 2015 रोजी प्रकाशित
‘इनऑर्बिट’ समोरील जागा परत मागण्याचा सिडकोचा आदेश ‘जैसे थे’
वाशी येथील हॉटेल फोर्थ पॉइंट आणि इनऑर्बिट मॉलसमोरील बळकावलेली ५,४९० चौरस मीटर मोकळी जागा परत करण्याबाबत सिडकोने के. रहेजा कॉर्पोरेशनला दिलेले आदेश दोन आठवडे ‘जैसे थे’ ठेवण्याचे
First published on: 17-01-2015 at 03:51 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cidco order to take back land for inorbit mall