DCM Eknath Shinde on Civil-Military Coordination Meeting : भारत -पाकिस्तान दरम्यान तणाव निवळला असला तरीही भारतावरील धोका अद्याप शमलेला नाही. त्यामुळे भारताने कायमच सावध भूमिका घेतली आहे. भारतीय लष्कराचे तिन्ही दल सीमेवर कार्यरत असून राज्याच्या सीमाही सुरक्षित राहाव्यात याकरता राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारने भारतीय लष्कराबरोबर आज बैठक घेतली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीत भारतीय लष्कराचे महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग, भारतीय नौदलाचे महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग, भारतीय हवाई दलाचे एअर व्हाइस मार्शल, महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव, महाराष्ट्राचे डीजीपी, गृह आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसंच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही यावेळी हजर होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, “राज्याच्या सुरक्षेसंदर्भात बैठक झाली. राज्य सरकार आणि संरक्षण दल यांनी एकत्र येऊन सहकार्याने काम करावं याकरता नोडल ऑफिसर नियुक्त करण्यासंदर्भात चर्चा झाली. मुंबईला सातत्याने लक्ष्य केलं जातं, त्यामुळे जे लक्ष्य करतात त्यांचं कार्य काय, त्यावर लक्ष ठेवणं, तपासणी करणं यावर चर्चा झाली. मी तिन्ही दलांचं अभिनंदन करतो, ज्यांनी सीमेवर चोख प्रत्युत्तर दिलंय. पाकिस्तानला आता स्वतःच्या लायकीत राहून काम केलं पाहिजे, भारताला त्रास देण्याचं काम सोडलं पाहिजे.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“नागरी सुरक्षेच्या संदर्भात आज एक बैठक घेण्यात आली. सध्याच्या युद्धजन्य स्थितीत महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांची आपण बैठक घेतली होती. पण सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांशी आपण बैठक घेतली नव्हती. आजच्या बैठकीत या दिवसांमध्ये आपण अधिक काय करायची गरज आहे, भविष्यात आपण काय केलं पाहिजे आणि आत्ताही आपण कसं सतर्क राहायला हवं यादृष्टीने सैन्यदलाच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत, हे समजून घेतलं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“आपण जिंकू शकत नाही हे पाकिस्तानला माहिती आहे. त्यामुळे ते प्रॉक्सी वॉर सुरू करतात. त्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे संवेदनशील आहे. त्या दृष्टीने काय खबरदारी घ्यायला हवी, यासाठी आजची बैठक आम्ही घेतली”, असंही ते म्हणाले.