Punishment For Rakesh Kishore, Who Attacked CJI B. R. Gavai: सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर दोन दिवसांपूर्वी राकेश किशोर नावाच्या वकिलाने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला होता. राकेश किशोर यांच्या या कृतीवर देशभरातून टीका होत आहे. अशात भारताचे माजी अ‍ॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनीही या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “न्यायालये धार्मिक विचारांचा प्रसार करण्यासाठी नाहीत.”

न्यायालयाचा वापर…

“मला असे वाटते की आरोपी एकतर कट्टर धार्मिक आहे, जो एका महिन्यापूर्वी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी केलेल्या काही निरीक्षणाने प्रभावित झाला आहे किंवा तो न्यायालयाचा वापर राजकीय व्यासपीठ म्हणून किंवा एखाद्या धर्माबद्दलचे आपले विचार पसरवण्यासाठी धार्मिक व्यासपीठ म्हणून करत आहे”, असे मुकुल रोहतगी एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाले.

सनातन धर्माविरुद्ध कोणीही…

“दुर्दैवाने, एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकला आणि मला सांगण्यात आले की, जेव्हा पोलीस त्याला न्यायालयातून बाहेर घेऊन जात होते, तेव्हा तो सनातन धर्माविरुद्ध कोणीही वाईट बोलू शकत नाही असे काहीतरी म्हणत होता. निश्चितच धर्माची ही तथाकथित अभिव्यक्ती किंवा असे कोणतेही प्रकार न्यायालयात पूर्णपणे अस्वीकार्य आहेत. मग ते वकिलाने केले असेल किंवा इतर कोणी केले असेल. न्यायालये धार्मिक विचारांचा प्रसार करण्यासाठी नसतात”, असे मुकुल रोहतगी पुढे म्हणाले.

राकेश किशोर यांना काय शिक्षा होऊ शकते?

मुकुल रोहतगी यांनी हे कृत्य पूर्णपणे अक्षम्य असल्याचे म्हणत, “कायद्यानुसार हे गुन्हेगारी अवमानाचे सर्वात घोर स्वरूप आहे. त्यासाठी आरोपी वकिलाला सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते.”

राकेश किशोर यांची प्रतिक्रिया

दरम्यान, वकील राकेश किशोर यांनी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याच्या त्यांच्या कृतीचे समर्थन केले आणि मध्य प्रदेशातील खजुराहो येथील जावरी मंदिरातील भगवान विष्णूंच्या मूर्तीच्या जिर्णोद्धार करण्याच्या मागणीच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या टिप्पणीमुळे ते दुखावले असल्याचे म्हटले.

सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर केलेल्या हल्ल्याबाबत बोलताना वकील राकेश किशोर यांनी त्यांना या कृत्याचा कोणताही पश्चात्ताप नसल्याचे म्हटले आहे. “हे मी केले नाही, हे देवाने केले आहे. भारताच्या सरन्यायाधीशांनी सनातन धर्माची थट्टा केली. हा देवाचा आदेश होता, कृतीची प्रतिक्रिया होती”, असे ते म्हणाले.