न्यायालयीन सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी केलेल्या तोंडी टिप्पण्यांचा समाजमाध्यमांत गैरअर्थ लावला जात असल्याबद्दल सरन्यायाधीश न्या. भूषण रामकृष्ण गवई यांनी मंगळवारी चिंता व्यक्त केली. मध्य प्रदेशातील खजुराहो येथील विष्णुमूर्तीच्या जीर्णोद्धार याचिकेवर सरन्यायाधीशांनी केलेल्या टिप्पणीवर नाराजी दर्शवत वकील राकेश किशोर यांनी सोमवारी त्यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी सरन्यायाधीशांनी न्यायालयात सुनावणीदरम्यान समाजमाध्यमातील गैरअर्थाबद्दल टिप्पणी केली.

अखिल भारतीय न्यायाधीश संघटनेने न्यायिक अधिकाऱ्यांच्या सेवा अटी, वेतनश्रेणी आणि कामातील प्रगतीशी संबंधित मुद्द्यांवर दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश न्या. गवई आणि न्या. के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. सरन्यायाधीशांनी या वेळी त्यांचे सहकारी न्या. चंद्रन यांना समाज माध्यमातील चुकीचा अर्थ लावण्यापासून रोखल्याबद्दलचा एक किस्सा सांगितला.‘धीरज मोर प्रकरणाची सुनावणी करत असताना, माझ्या ज्ञानी बंधूंना (न्या. चंद्रन) काहीतरी भाष्य करायचे होते. तेव्हा मी त्यांना ते करण्यापासून रोखले. अन्यथा, समाजमाध्यमात त्याचे काय वृत्तांकन केले जाईल याची आम्हाला कल्पनाही नसेल. मी माझ्या भावाला विनंती केली की ते फक्त माझ्या कानापर्यंत मर्यादित ठेव,’ असे सरन्यायाधीश म्हणाले.

सनातनी वकिलाकडून स्वतःच्या कृत्याचे समर्थन

सरन्यायाधीश न्या. भूषण रामकृष्ण गवई यांना सर्वोच्च न्यायालयात बूट फेकून मारण्याचा प्रयत्न करणारे वकील राकेश किशोर यांनी या कृत्याचा आपल्याला कोणताही पश्चात्ताप नाही असे मंगळवारी सांगितले. त्याचवेळी त्यांनी स्वतःच्या कृत्याचे समर्थनही केले. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना राकेश किशोर म्हणाले की, “खजुराहो येथील जवारी मंदिरातील श्री विष्णूच्या मूर्तीचा जीर्णोद्धार करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळताना सरन्यायाधीशांनी जी टिप्पणी केली, त्यामुळे माझ्या भावना दुखावल्या गेल्या.”

समाजमाध्यमावरील प्रभावक अजीत भारतीची चौकशी

नोएडा : प्रभावक अजीत भारती याने समाजमाध्यमांवर केलेल्या टिप्पण्यांबाबत नोएडा पोलिसांनी मंगळवारी चौकशी केली. सरन्यायाधीश न्या. गवई यांच्यावर बूटफेकीचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर अजीत भारतीने या आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या होत्या. मात्र, आपल्या अलिकडील एका टिप्पणीबाबत पोलिसांनी आपल्याला बोलावले होते असा दावा भारतीने केला. चौकशीनंतर पोलिसांनी त्याला जाऊ दिले. त्याला अटक करण्यात आली नाही, असे सेक्टर ५८च्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, पोलिसांनी चौकशी केल्यानंतर काही वेळाने अजीत भारतीने “सरकार भी हमारी, सिस्टम भी हमारा,” अशी पोस्ट ‘एक्स’वर केली आहे.