CJI BR Gavai attacker rakesh kishor barred from practising in Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश बी. आर. गवई यांना बूट फेकून मारण्याचा प्रयत्न करणारे वकील राकेश किशोर यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सोमवारी घडलेल्या बूट घटनेनंतर आता सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन(SCBA)ने तात्काळ प्रभावाने वकील राकेश किशोर यांची तात्पुरती सदस्यता रद्द केली आहे, तसेच त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या ठरावात म्हटले आहे की, २७-०७-२०११ या तारखेचे किशोर यांचे तात्पुरते सदस्यत्व क्रमांक K-01029/RES हे तात्काळ प्रभावाने संपुष्टात आणले जात आहे आणि त्यांचे नाव असोसिएशनच्या यादीतून काढले जाईल. एकमताने मंजूर करण्यात आलेल्या ठरावामध्ये पुढे म्हटले की, असे निंदनीय आणि अनियंत्रित वर्तन हे शोभणारे नव्हते आणि बार असोसिएशनच्या सदस्यांकडून अपेक्षित शिस्तीशी विसंगती दाखवणारे होते.

मंजूर करण्यात आलेल्या ठरावामध्ये म्हटले की, यामध्ये पुढे म्हटले आहे की किशोर यांचे SCBA सदस्यत्व कार्ड, जर जारी केले गेले असेल तर, तर रद्दअसेल आणि ते तात्काळ जप्त केले जाईल, तसेच त्यांचे प्रॉक्सिमिटी ॲक्सेस कार्ड तात्काळ रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सेक्रेटरी-जनरल यांना पत्र पाठवले जाईल.

हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार ७१ वर्षीय किशोर यांच्यावर फौजदारी अवमान कारवाई करण्याचा विचार केला जात आहे. कायदेशीर कारवाई सुरू करण्याची परवानगी मिळावी यासाठी एक पत्र अॅटर्नी जनरल यांना पाठवण्यात आले आहे. यापूर्वी बार काउन्सिल ऑफ इंडियाने देखील किशोर यांचे निलंबन केले आहे.

बंगळुरूमध्ये गुन्हा दाखल

राकेश किशोर यांच्याविरुद्ध बंगळुरूमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑल इंडिया अ‍ॅडव्होकेट्स असोसिएशनचे अध्यक्ष भक्तवचल यांच्या लेखी तक्रारीवरून मंगळवारी संध्याकाळी बंगळुरूमधील विधान सौधा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

नेमकं काय झालं होतं?

मध्य प्रदेशातील खजुराहो येथील विष्णुमूर्तीच्या जीर्णोद्धार याचिकेवर सरन्यायाधीशांनी केलेल्या टिप्पणीवर नाराजी दर्शवत वकील राकेश किशोर यांनी सोमवारी त्यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर याचे पडसाद सर्वत्र उमटल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान सरन्यायाधीश गवई यांना सर्वोच्च न्यायालयात बूट फेकून मारण्याचा प्रयत्न करणारे वकील राकेश किशोर यांनी या कृत्याचा आपल्याला कोणताही पश्चात्ताप नसल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर त्यांनी स्वतःच्या कृत्याचे समर्थनही केले आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना राकेश किशोर म्हणाले की, “खजुराहो येथील जवारी मंदिरातील श्री विष्णूच्या मूर्तीचा जीर्णोद्धार करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळताना सरन्यायाधीशांनी जी टिप्पणी केली, त्यामुळे माझ्या भावना दुखावल्या गेल्या.”