केंद्र सरकाने नुकत्याच जारी केलेल्या जीएसटी दरांनंतर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अन्नधान्यासह इतर महत्वाच्या वस्तूंवर जीएसटी लावण्यात आल्यामुळे सामान्य नागरीकांचे बजेट कोलमडले आहे. जीएसटीच्या सुधारित दरांनंतर केंद्र सरकारने अंत्यसंस्कार, स्माशानभूमी आणि शवागार सेवांवरही १८ टक्के जीएसटी लावल्याचा दावा करण्यात येत आहे. या दाव्यानंतर पीबीआय विभागाने स्पष्टीकरण देणारं ट्वीट केले आहे.
पीबीआय विभागाने दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारकडून अंत्यविधीशी निगडित वस्तूंवर लावण्यात आलेल्या १८ टक्के जीएसटी कराची बातमी खोटी आहे. केंद्राकडून असा कोणताही कर लावण्यात आलेला नाही. मात्र, १८ टक्के जीएसटी कर हा अशा अंत्यसंस्काराशी निगडीत कामासाठी असलेल्या कंत्राटावर लावण्यात आला असल्याचे पीबीआयने स्पष्ट केले आहे.
दूध, दही, पनीर पदार्थांवर पाच टक्के जीएसटी
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या नेतृत्वाखालील जीएसटी परिषदेकडून दूध, दही आणि पनीरसारखे पॅक केलेले खाद्यपदार्थ, पॅक केलेले तांदूळ आणि गहू यासारख्या पदार्थांवर पाच टक्के वस्तू व सेवा कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयावरून विरोधी पक्षांसह अनेकांनी आक्षेप नोंदवला. तसेच महागाईवरून सरकारवर टीकाही करण्यात आली. या आरोपांवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १४ ट्वीट करून स्पष्टीकरण दिले होते. जीएसटी लागू झाला तेव्हा ब्रँडेड धान्य, डाळी, मैदा यावर ५ टक्के जीएसटी दर लागू झाला होता. नोंदणीकृत ब्रँड किंवा ब्रँड अंतर्गत विकल्या जाणार्या वस्तूंवरच कर आकारण्यासाठी नंतर त्यात सुधारणा करण्यात आली असल्याचे सीतारमण यांनी स्पष्ट केले होते.