पीटीआय, श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील घनदाट जंगल परिसरात सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक शनिवारी चौथ्या दिवशीही सुरूच आहे. त्यासाठी ‘ड्रोन’ आणि हेलिकॉप्टरची मदत घेतली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बुधवारी येथे झालेल्या चकमकीतच सुरक्षा दलाचे तीन अधिकारी आणि एक जवान हुतात्मा झाला आहे.
चकमकीच्या चौथ्या दिवशी शनिवारी पुन्हा हल्ला सुरू होताच, सुरक्षा दलांनी जंगलाच्या दिशेने अनेक तोफगोळे डागले. ‘ड्रोन’द्वारे टिपलेल्या चित्रीकरणात शुक्रवारी गुहेत गोळीबार केल्यानंतर एक दहशतवादी आश्रयासाठी धावत असल्याचे दिसले. काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजयकुमार यांनी शुक्रवारी रात्री उशिरा सांगितले की, विशिष्ट खबर मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली आणि येथे अडकलेल्या दोन किंवा तीन दहशतवाद्यांवर नियंत्रण मिळवू, असा दावाही त्यांनी केला. येथे बुधवारी सकाळी चकमकीत ‘१९ राष्ट्रीय रायफल्स’चे कमांडिंग अधिकारी कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशीष ढोचक आणि जम्मू-काश्मीर पोलीस उपअधीक्षक हुमायूं भट्ट आणि लष्कराचा अन्य एक जवान हुतात्मा झाला.
काश्मीरमध्ये ठोस पावले उचला : काँग्रेस
काश्मीर खोऱ्यात दहशतवादाचे पुनरुज्जीवन होत असून, सरकारने त्यास आळा घालण्यासाठी सर्वसमावेशक धोरण आखून ठोस पावले उचलण्याची मागणी जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष विकार रसूल वनी यांनी शनिवारी केली. कोकरनाग भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत हुतात्मा झालेल्या सुरक्षा दलाच्या तीन अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहून, दहशतवाद्यांचा निषेध केला. सुरक्षा दलाचे अधिकारी हुतात्मा होणे, ही दु:खद घटना आहे, असे ते म्हणाले.