बंगळुरू येथे एका सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार ही घटना प्रसिद्ध जापनीज एनिमे वेब सीरीज ‘डेथ नोट’शी संबंधीत आहे. ही घटना सीके अच्चुकाट्टू भागात ३ ऑगस्टच्या रात्री घडली. दरम्यान पोलिसांनी या मृत्यूच्या घटनेची चौकशी सुरू केली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हा अल्पवयीन मुलगा या वेब सीरिजचा मोठा चाहता होता, त्याने त्याच्या खोलीत त्या शोमधील एक पात्र देखील रेखाटले होते. यामुळेच तपासकर्त्यांनी या सीरिजचा या आत्महत्येमध्ये काही हातभार आहे का या दृष्टीने तपास सुरू केला.

अल्पवयीन मुलाच्या पालकांनी सांगितले की त्याला शाळेत किंवा घरी विशेष अशा कोणत्याही अडचणी येत नव्हत्या, त्यामुळे त्याने हे टोकाच्या पाऊल उचलण्यामागील नेमकी कारणे अद्याप स्पष्ट होऊ शकलली नाहीत. पोलिसांकडून या मुलाचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे, याचे फॉरेन्सिक विष्लेशन केले जाणार आहे. न्यूज१८ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

डेथ नोट काय आहे?

डेथ नोट या सीरिजमध्ये एका शाळेतील विद्यार्थ्याला डेथ नोट नावाची एक गुढ वही सापडते. यामुळे या मुलाला एका सुपर पॉवर मिळते ज्यानुसार, त्याने कोणाचेही नाव डेथ नोटमध्ये लिहिल्यास, त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. पुढे गुन्हेगारी मुक्त समाज तयार करण्यासाठी हा विद्यार्थी त्याला जगभरात अनैतिक वाटतील अशा लोकांच्या हत्या करू लागतो. तर दुसरीकडे जपानी टास्क फोर्स त्याला पकडण्यासाठी करत असलेले प्रयत्न या सीरिजमध्ये दाखवले आहेत.

दिल्लीतही असाच प्रकार समोर

दुसऱ्या एका घटनेत दिल्लीतील अंबिका विहार कॉलनीमध्ये एका १० वर्षीय मुलाचा मृतदेह त्याच्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा मुलला मोबाईलवर गेम्स खेळण्याचे वेसन होते.

घटनास्थळावरून सापडलेल्या मोबाईलची तपासणी केली असता हा मुलगा किमान १० ते ११ तास मोबाइल वापरत असे. तो सात तास गेम खेळत असे आणि जवळपास चार तास युट्यूब पाहात असे.

या मुलाच्या वडीलांनी पोलिसांना सांगितले की, घटना घडली त्या ३१ जुलै रोजी मुलगा मुसळधार पावसामुळे शाळेत गेला नव्हता. ते आणि त्याची पत्नी सकाळी कामावर गेले आणि संध्याकाळी परत आल्यावर त्यांना मुलाचा मृतदेह लटकलेला आढळला.