दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणामध्ये ईडीकडून अटक झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयाने २१ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. यानंतर आता २१ दिवसांच्या जामीनाची मुदत आज म्हणजे १ जून रोजी संपत आहे. त्यामुळे २ जून रोजी अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करावं लागणार आहे.

दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयात वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळण्याच्या याचिकेवर आज (१ जून) सुनावणी झाली. या याचिकेवरील निर्णय राऊस अव्हेन्यू न्यायालयाने ५ जूनपर्यंत निर्णय राखून ठेवला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वैद्यकीय चाचणीसाठी ७ दिवसांचा जामीन मागितला होता. मात्र, या जामीनाला अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयात विरोध केला. तसंच अरविंद केजरीवाल यांच्या आरोग्याबाबत त्यांच्याकडून खोटी विधाने करण्यात येत असल्याचा आरोप करत केजरीवालांनी तथ्ये लपवल्याचं ईडीने म्हटलं.

हेही वाचा : Exit Poll 2024 Live Update : देशात इंडिया की एनडीए? थोड्यात वेळात जाहीर होणार एक्झिट पोल, वाचा सविस्तर…

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रकृतीच्या कारणास्तव मागितलेल्या अंतरिम जामिनाला ईडीने विरोध करताना ईडीने सांगितलं की, अरविंद केजरीवाल यांनी सर्व राज्यांमध्ये प्रचार केला. त्यांची वैद्यकीय चाचणी झाली नाही. आता आत्मसमर्पणाच्या वेळी ते वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामीन मागत आहे. केजरीवाल चाचणीला विलंब करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच त्यांनी ७ किलोने वजन कमी झाल्याचा खोटा दावा केला असल्याचंही ईडीने म्हटलं.

यावर केजरीवाल यांच्या वकीलांकडून सांगण्यात आलं की,’राष्ट्रीय पक्ष असलेल्या आम आदमी पक्षाच्या निवडणूक प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. आता ही याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला मुदतवाढ देण्यासाठी नसून वैद्यकीय जामिनासाठी आहे, असं केजरीवाल यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं. यानंतर या याचिकेवरील निर्णय राऊस अव्हेन्यू न्यायालयाने ५ जूनपर्यंत निर्णय राखून ठेवला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे जामीनाची मुदती वाढवून मागितली होती. मात्र, हा मुदतीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारनेच फेटाळून लावला होता. अरविंद केजरीवाल यांच्यावतीने अंतरिम जामिनाची मुदत वाढवून मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत तत्काळ सुनावणी घेण्याची मागणी केली होती. मात्र, या तत्काळ सुनावणीला सुनावणीला नकार दिला होता. त्यानंतर आज राऊस अव्हेन्यू न्यायालयानेही वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळण्याच्या याचिकेवरील निर्णय ५ जून पर्यंत राखून ठेवल्यामुळे अरविंद केजरीवाल यांना २ जून रोजी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करावं लागणार आहे.