केंद्रीय मंत्र्यांनी बाजू सावरली; देणगीच्या सक्तीशी संबंध नसल्याचा नायडू, आठवलेंचा दावा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी लष्कर निधीला पाच कोटींच्या देणगीची सक्ती पूर्णत: चुकीची असल्याची टिप्पणी केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे मंत्री व्यंकय्या नायडू यांनी मंगळवारी केली. मात्र, त्याच वेळी त्यांनी वादात सापडलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही बाजू सावरून घेतली.

दुसरीकडे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे तर फडणवीसांच्या मदतीला धावले. ‘‘मुख्यमंत्र्यांवर टीका कसली करताय? याउलट कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ  न दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायले हवे,’’ असे आठवले म्हणाले. चर्चेद्वारे तोडगा काढण्याचे कर्तव्य त्यांनी बजावले. नाही तर ऐन दिवाळीमध्ये राज्यात गोंधळ निर्माण होऊ  शकला असता, असेही ते म्हणाले. त्याच वेळी सक्तीच्या देणगीची लष्कराला गरज नसल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

माध्यम व चित्रपट उद्योगाशी संबंधित कार्यक्रमादरम्यान नायडू म्हणाले, ‘‘सक्तीच्या देणगीचा प्रस्ताव अत्यंत अयोग्य आहे. त्याच्याशी आम्ही सहमत नाही. अशा पद्धतीचा विचार सरकार करीत नाही. हा प्रस्ताव एक राजकीय पक्ष (मनसे) व चित्रपट निर्मात्यामधील आहे. त्याच्याशी सरकारचा संबंध नसल्याचे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलेले आहे. वाद चिघळवू नये, यासाठीच फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. अन्यथा, अनावश्यक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता.’’

देणगीसाठी मानगूट पकडणे अमान्य – पर्रिकर

नवी दिल्ली :  लष्कराला राजकारणात ओढल्याबद्दल दलात नाराजीचा सूर आहे. देणगीची संकल्पना ऐच्छिक आहे, त्यासाठी एखाद्याची मानगूट पकडणे आपल्याला मान्य नाही, ते प्रशंसनीय नाही, असे असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर म्हणाले. चित्रपट निर्मात्यांना लष्कराच्या कल्याणनिधीसाठी पाचकोटी रुपये देण्याच्या राज ठाकरे यांच्या फतव्याच्या पाश्र्वभूमीवर पर्रिकर यांनी हे वक्तव्य केले.

राज दहशतवादी नव्हे; पण गुंड नक्की : आठवले

केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी राज ठाकरे यांना चांगलेच ओरबाडले. अगोदर विरोध आणि नंतर पाठिंबा देण्याचा खेळ ते नेहमीच खेळतात, असे सांगून ते म्हणाले, ‘‘राज हे काही दहशतवादी नाहीत, पण ते गुंडगिरी नक्कीच करतात. परप्रांतीयांना अथवा परदेशींना हुसकावून लावण्यासाठी धमकी देतात. आपली ताकद धमक्यांमध्ये वाया घालविण्याऐवजी ती मराठी बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी वापरावी.’’

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis on e dil hai mushkil issue
First published on: 26-10-2016 at 02:13 IST