नवी दिल्ली : दिल्ली दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गुरुवारचा दिवस केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीविना गेला. त्यामुळे शिंदे राजधानीमध्ये कशासाठी रेंगाळले असा प्रश्न विचारला जात आहे.

शिवसेनेचे १३ राज्यांतील प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात सामील झाले. त्यानिमित्त बुधवारी महाराष्ट्र सदनामध्ये जंगी कार्यक्रमही घेण्यात आला होता. हा कार्यक्रम संपल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा शिंदे मुंबईला रवाना होणार असल्याचे सांगितले जात होते. पण, त्यांचा गुरुवारीही दिल्लीत मुक्काम होता. मुख्यमंत्री शिंदे केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी दिल्लीत थांबल्याचे सांगण्यात आले. मात्र, गुरुवारी मुख्यमंत्र्यांची एकाही केंद्रीय मंत्र्याची भेट झाली नसल्याचे समजते.

राज्यातील काही कायदेशीर बाबींसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे केंद्रीय विधिमंत्री किरण रीजिजू यांची भेट घेणार होते. पण, ते दिल्लीत नसल्याने शिंदे यांनी रीजिजू यांच्याशी फोनवरून बोलणे केले.

केंद्रीय वाहतूक व रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी व केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचीही ते भेट घेणार असल्याची चर्चा शिंदे दिल्लीत येण्यापूर्वीपासून सुरू होती. पण, या केंद्रीय मंत्र्यांपैकी एकाचीही त्यांची भेट होऊ शकली नाही. शिंदे गुरुवारी दिवसभर दिल्लीत असल्यामुळे कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, मोदी-शहांची शिंदे यांची भेट होऊ शकली नाही.

मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात दोघांची सविस्तर चर्चा झाली.

गडकोटांचे संवर्धन, मुंबई ते किल्ले रायगड असे सी फोर्ट सर्किट टुरिझम यासंदर्भातही चर्चा करण्यात आली.

विविध विषयांवर विधिज्ञांशी चर्चा

मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तसेच, निवडणूक चिन्हांसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुरू असलेली सुनावणी, राज्यातील सत्तांतर नाटय़ासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील लढाई अशा महत्त्वाच्या कायदेशीर मुद्दय़ांवर विधिज्ञांशी शिंदे यांनी चर्चा केल्याचे समजते. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोरील सुनावणी २७ सप्टेंबर रोजी होणार आहे.