बिहारमधील नितीश कुमार सरकारने गुरुवारी विधानसभेत आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव मांडला. या विधेयकानुसार बिहारमध्ये मागासवर्गीय, अत्यंत मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी ६५ टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. हे विधेयक पारीत करत असताना विधानसभेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री जितन मांझी यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. यावेळी नितीश कुमार यांनी जितन राम मांझी हे माझ्या मूर्खपणामुळे मुख्यमंत्री झाले, असं विधान केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकारानंतर जितन राम मांझी यांनी विधानसभेबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत नितीश कुमार यांच्यावर टीकास्र सोडलं. यावेळी बिहारचे माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी म्हणाले, “विधानसभेत मला उभं राहून बोलायचं होतं, पण मुख्यमंत्री (नितीश कुमार) उठले आणि काहीही बरळू लागले. मला आश्‍चर्य वाटलं की, ते हेच नितीश कुमार आहेत का? जे काही दिवसांपूर्वी होते. आज ते एका वेगळ्या रुपात पाहायला मिळाले. मला वाटतं की, त्यांच्यात काहीतरी मानसिक समस्या आहेत. ज्यामुळे ते असं बोलत होते. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय म्हणून ते तसं बोलले. त्यांनी जितन राम मांझी यांना कमी लेखले. त्यांना वाटलं असावं की मी भुईया-मुशर समाजाचा आहे, त्यामुळे ते जे सांगतील ते मी करेन.”

नितीश कुमार विधानसभेत नेमकं काय म्हणाले?

जितन राम मांझी यांच्यावर टीका करताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, माझी चूक होती की मी अशा व्यक्तीला मुख्यमंत्री केलं. त्यांना मुख्यमंत्री केल्यानंतर दोनच महिन्यात माझ्या पक्षाचे लोक त्यांच्याबद्दल तक्रारी करू लागले. काहीतरी गडबड आहे, त्यांना पदावरून हटवा, अशी मागणी ते करू लागले. त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो. पण ते मी मुख्यमंत्री होतो, असं म्हणत फिरतात. पण माझ्या मूर्खपणामुळे ते मुख्यमंत्री झाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm nitish kumar mental health is disturbed former bihar cm jitan ram manjhi statement rmm
First published on: 09-11-2023 at 18:28 IST