Jammu and Kashmir Border Tension: जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर तातडीची बैठक बोलावून सीमावर्ती भागातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सीमाभागात असलेल्या जिल्ह्यातील जिल्हा उपायुक्तांच्या बैठका घेऊन त्यांनी सर्व परिस्थितीचा विचार करता प्रशासनाला तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सीमेपलीकडून पाकिस्तानतर्फे गोळीबार सुरू असून यामुळे झालेल्या नुकसानीचाही आढावा त्यांनी घेतला.
या बैठकीबद्दल माहिती देणारे निवेदन सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. यात म्हटले की, सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असलेल्या जिल्ह्यामध्ये तणावाची परिस्थिती आहे. याबद्दलचा आढावा मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी घेतला.
मुख्य सचिव अटल डुल्लो, जम्मू आणि काश्मीरचे विभागीय आयुक्त, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाचे आयुक्त, आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव, पुंछ, राजौरी, कठुआ, सांबा, बारामुल्ला, कुपवाडा आणि बोंदीपुरा जिल्ह्यांचे उपायुक्त या बैठकीस उपस्थित होते.
सीमावर्ती जिल्ह्यांसाठी आकस्मिक निधी वितरीत
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बैठकीत सांगितले की, सीमावर्ती भागातील जिल्ह्यांना ५ कोटी आणि इतर जिल्ह्यांना २ कोटींचा आकस्मिक निधी तात्काळ वितरीत करण्यात येत आहे. तात्काळ उपाययोजना राबविण्यासाठी जिल्हाधिकारी हा निधी वापरू शकतात.
नागरिकांच्या जीवाचे रक्षण करण्यास आमची प्राथमिकता असल्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. सीमाभागात नागरिकांना निवारा आणि बंकर उपलब्ध करून देणे, आणीबाणीच्या प्रसंगावेळी तात्काळ बाहेर पडणे आणि पुरेशा प्रमाणात अन्न व इतर जीवनावश्यक गोष्टींचा साठा करून ठेवण्याचे निर्देश ओमर अब्दुल्ला यांनी दिले.
जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनीही ऑपरेशन सिंदूरनंतर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहशतवादाच्या विरोधात कडक पाऊले उचलली जात आहेत, असे ते म्हणाले. त्यांनीही सीमावर्ती भागातील जिल्ह्यांचा आढावा घेतला.