कोळसा घोटाळाप्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविरुद्ध समन्स काढण्यात यावे, अशी मागणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांनी केली आहे. कोडा हे स्वत: या प्रकरणातील आरोपी असून त्यांनी सोमवारी विशेष न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात मनमोहन सिंग यांच्यासह उर्जा खात्याचे तत्कालीन सचिव आनंद स्वरूप आणि तत्कालीन खाण आणि भुगर्भ खात्याचे सचिव जय शंकर तिवारी यांचा आरोपींच्या यादीत समावेश करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, न्यायालयाने सीबीआयला कोडा यांनी सादर केलेल्या अर्जासंदर्भात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ ऑगस्ट रोजी होणार आहे.  मागील सुनावणीच्यावेळी विशेष कोर्टाने मधु कोडा, माजी केंद्रीय कोळसा सचिव एचसी गुप्ता आणि इतर सात जणांविरोधात कोळसा खाण लिलावात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी आरोप निश्चित केले होते. या सुनावणीत कोणीही आरोपांचा स्वीकार केला नव्हता आणि पुढील सुनावणी करण्याची मागणी केली होती. यापूर्वी विशेष न्यायालयाने ११ मार्च रोजी कोळसा खाणवाटप गैरव्यवहारप्रकरणी मनमोहन सिंग यांना समन्स बजावले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाकडून या समन्सला स्थगिती देण्यात आली होती.  मार्च २०१२मध्ये कॅगने हा घोटाळा चव्हाट्यावर आणला होता. २००४ ते २००९ या कालावधीत केंद्र सरकारने चुकीच्या पद्धतीने कोळसा खाणींचे वाटप केल्याचा आणि त्यामुळे देशाचे १.८६ लाख कोटींचे नुकसान झाल्याचा ठपका ‘कॅग’ने आपल्या अहवालात ठेवला होता.