कंपनीने अद्ययावत तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यामुळे काही कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये किमान ६,००० आयटी तज्ज्ञांना आपली नोकरी गमवावी लागण्याची शक्यता आहे असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून आयटी क्षेत्राची स्थिती नाजूक झाली असल्याचे या क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. नव्या डिजीटल सर्व्हिसेस मुळे अनेक नोकऱ्या जाऊ शकतात असे त्यांनी म्हटले आहे.
कर्मचाऱ्यांच्या पगारीतील तफावत हे देखील या मागचे एक कारण आहे असे तज्ज्ञांनी सांगितले. काही कर्मचाऱ्यांचा पगार हा २०,००० ते ३०,००० दरम्यान असतो तर व्यवस्थापकांचा पगार कोट्यवधी (वार्षिक) असतो. त्यांच्या पगारात असणाऱ्या तफावतीमुळे हा तणाव निर्माण होत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
मार्चच्या शेवटी वार्षिक मूल्यांकनावेळी कामगिरी व्यवस्थितरित्या पार न पाडणाऱ्या १ टक्के कर्मचाऱ्यांना कंपनी नोकरीवरुन काढून टाकते. ही प्रक्रिया दरवर्षी होते. परंतु यावेळी नेहमीपेक्षा अधिक लोकांना कामावरुन काढून टाकण्यात येईल. त्याचबरोबर ऑटोमेशनमुळे कनिष्ट स्तरावरील कामे करण्यासाठी व्यक्तीची आवश्यकता कमी झाली आहे. त्याचाही परिणाम या क्षेत्रावर झाला आहे.
दोन वर्षांपूर्वी कंपनींने १ ते २ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले होते. मागच्या वर्षी १ टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले. कंपनीतील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या २,६०,००० आहे. त्यापैकी १,८८,००० कर्मचारी भारतामध्ये आहेत.
आमची उद्दिष्टे गाठण्यासाठी आम्ही दरवर्षी ही प्रक्रिया राबवतो. त्यामुळे आवश्यक ती कौशल्ये असणारी व्यक्तीच कंपनीमध्ये थांबते. अन्य कंपन्यांमध्ये जर त्यांना नोकरीची संधी उपलब्ध असेल तर त्यांना जाऊ दिले जाते असे कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. मागील वर्ष कंपनीसाठी आव्हानात्मक होते. नेहमी २ अंकी विकासदर गाठणाऱ्या काँग्निजंटचा विकासदर २०१६ मध्ये ८.६ टक्के होता.