अलीकडेच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पाचही राज्यात पराजयाचा सामना केल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एकीकडे निवडणुकीच्या मैदानात काँग्रेस सपाटून मार खात असताना, काँग्रेसचे अनेक बडे नेते पक्षाला सोडून जाताना दिसत आहेत. येत्या काळात गुजरातमध्ये देखील विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. पण गुजरातमधील काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हार्दिक पटेल यांनी आपला व्हॉट्सअ‍ॅप डीपी (WhatsApp DP) बदलला आहे. त्यांच्या डीपीमधून काँग्रेस गायब झाला असून त्यांनी भगवं वस्त्र परिधानकेलेला फोटो लावला आहे. त्यामुळे हार्दिक पटेल लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, अशा चर्चांना उधाण आलं आहे. त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप बरोबर टेलेग्रामवरील फोटो देखील बदलला आहे.

हार्दिक पटेल पक्षाला सोडचिठ्ठी देणार, या संदर्भाच्या बातम्या समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील अशाप्रकारच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. मात्र काही काळापासून हार्दिक पटेल हे पक्षाच्या हायकमांडवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यांनी अनेकदा याबाबत उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसमध्ये त्यांची अवस्था नव्या वराची नसबंदी केल्याप्रमाणे झाल्याचंही त्यांनी यापूर्वी म्हटलं होतं. पक्षात निर्णय घेण्याबाबत आपल्याकडे कोणतीही अधिकार नाहीत, असंही त्यांनी बोलून दाखवलं होतं. हार्दिक पटेल हे सध्या गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी स्वत: रामभक्त आहे- हार्दिक पटेल
एवढेच नव्हे तर, काही दिवसांपूर्वी हार्दिक पटेल यांनी आपण रामाचा खूप मोठा भक्त असल्याचं म्हटलं होतं. तसेच वडिलांच्या मृत्यूनंतर आपण चार हजार गीता वाटणार असल्याची घोषणाही त्यांनी केली होती. ‘माझ्या जन्म हिंदू धर्मात झाला असून हिंदू असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे,’ असंही ते म्हणाले होते. अशात हार्दिक पटेल यांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्रामवरील डीपीमधून काँग्रेस गायब करून त्याठिकाणी भगवं वस्त्र परिधान केलेला डीपी अपलोड केल्याने ते लवकरच पक्षाला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.