Coldrif Cough Syrup Sresan Pharma Company Owner Arrested in Chennai : देशाच्या विविध भागांत ‘कोल्ड्रिफ’ या कफ सिरपमुळे अनेक लहान मुलांनी आपला जीव गमावला आहे. यानंतर हे कफ सिरप बनणारी कंपनी श्रीसन फार्मास्युटिकल्सच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, कोल्ड्रिफ कफ सिरपमध्ये हे विषारी रसायन आढळल्याचा आरोप आहे.. त्यानंतर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू यासह अनेक राज्यांमध्ये याच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

श्रीसन फार्मास्युटिकल्स कंपनीने तयार केलल्या कफ सिरपच्या सेवनामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये अनेक मुलांचा मृत्यू झाला आहे. यानंतर कंपनीचे मालक जी. रंगनाथन (७५) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना गुरुवारी पहाटे चेन्नईतील कोडंबक्कम येथील त्यांच्या अपार्टमेंटमधून अटक करण्यात आली.

जी. रंगनाथन यांच्या कंपनीच्या कोल्ड्रिफ (Coldrif) नावाच्या कफ सिरपचे सेवन केल्यामुळे मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात अनेक मुलांचा मृत्यू झाला होता. यानंतर काही दिवसांतच ही अटक झाली आहे. या घटनेमुळे निकृष्ट दर्जाच्या औषधांचे उत्पादन आणि विक्री याबाबत चौकशी केली जात आहे.

दरम्यान पोलिस उपअधीक्षक जितेंद्र जाट यांच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेश पोलिसांच्या सात सदस्यांच्या पथकाने रंगनाथन यांना कोडंबक्कममधील अशोक नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील त्यांच्या निवासस्थानातून अटक केली.

अधिकाऱ्यांनी मागिती दिली की रंगनाथन यांना मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले, त्यानंतर त्यांना कांचीपुरम जिल्ह्यात घेऊन जाण्यात आले, येथे त्यांची श्रीसन फार्मास्युटिकल ही औषध निर्मिती कंपनी आहे. या कंपनीतून घेतलेल्या नमुन्यांमधून सिरपमध्ये विषारी भेसळ झाल्याचा संशय वाढला होता.

सिरपमध्ये आढळलं विषारी रसायन

मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये प्रशासनाने कोल्ड्रिफ कफ सिरपची विक्री आणि वितरण तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. मुलांच्या मृत्यूशी संबंधित असलेल्या या सिरपमध्ये विषारी पदार्थ आढळल्याचा आरोप आहे. चेन्नई येथील औषध परिक्षण प्रयोगळाशेतील सरकारी विश्लेषकांनी केलेल्या चाचणीचून असे आढळून आले आहे की, या कफ सिरपमध्ये ४८.६ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात विषारी औद्योगिक रसायन डायथिलीन ग्लायकॉल (Diethylene Glycol) आढळले आहे. यानंतर सिरपचा दर्जा हा स्टँडर्ड गुणवत्तेचा नाही असे जाहीर करण्यात आले आहे.