पश्चिम बंगालमधील कृष्णानगर महिला महाविद्यालय सध्या एका गोष्टीमुळे देशात चर्चेत आहे. या महाविद्यालमध्ये पुढील महिन्यात लिंगपरिवर्तित मनाबी बंडोपाध्याय प्राचार्य म्हणून रुजू होत आहेत. अशा पद्धतीने लिंगपरिवर्तित व्यक्ती एखाद्या महाविद्यालयाची प्राचार्य म्हणून रूजू होण्याची देशातील ही पहिलीच घटना आहे.
दक्षिण कोलकातामध्ये राहणाऱया मनाबी पूर्वी सोमनाथ या नावाने ओळखल्या जायच्या. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील नैहाती गावातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. २००३ मध्ये त्यांनी लिंगबदल शस्त्रक्रिया करून घेतली. प्राचार्य म्हणून निवड झाल्याचे समजल्यावर आपल्याला अत्यंत आनंद झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, खूप आनंद तर झाला आहेच. पण या घटनेनंतर माध्यमांनी माझ्यावरच लक्ष केंद्रित केल्यामुळे थोडेसे गोंधळल्यासारखेही झाले आहे. मला खूप फोन येताहेत. देशातील लिंगपरिवर्तित व्यक्तींच्या चळवळीला पुढे नेण्याच्या दृष्टीने माझे यश खूप मोठे असल्याचे मला समजते आहे. पण सध्यातरी केवळ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवरच मी लक्ष केंद्रित करणार आहे.
लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यापूर्वी आपल्याला सरकारी महाविद्यालयामध्ये काम करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते, अशीही आठवण त्या सांगतात. मला कोणते स्वच्छतागृह वापरण्याची परवानगी द्यावी, यावरूनही महाविद्यालयामध्ये मतमतांतरे व्यक्त करण्यात आली होती. पण समाज काय म्हणतोय, याकडे मी फार लक्ष दिले नाही. मी माझे काम प्रामाणिकपणे करत राहिले. आपले काम सचोटीने आणि आत्मीयतेने केल्यावर लोकही तुमच्याबद्दल आदर व्यक्त करायला लागतात, हे मला जाणवले, असे मनाबी यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: College in bengal to have countrys first transgender principal
First published on: 27-05-2015 at 03:26 IST