भारत आणि पाकिस्तान यांच्यातला तणाव वाढतानाच दिसतो आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधले तळ उद्ध्वस्त केल्यानंतरही पाकिस्तानने आगळीक करणं सोडलेलं नाही. आज लष्कराने पत्रकार परिषद घेतली. पाकिस्तानने भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. तसंच गुप्त माहिती काढण्यासाठी ३०० ते ४०० ड्रोन पाठवण्यात आले. मात्र त्यातील अनेक ड्रोन हे भारताने निकामी केले आहेत. पाकिस्तानने भारतीय हवाई क्षेत्राचंही उल्लंघन केलं होतं. पण भारताने उत्तराखल जशास तसं उत्तर दिलं. कर्नल सोफिया कुरेशी यांनी या सगळ्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
कर्नल सोफिया कुरेशी यांनी काय सांगितलं?-सोफिया कुरेशी
८ आणि ९ मेच्या रात्री पाकिस्तानी सैन्याने भारतावर निशाणा साधत भारतीय वायुक्षेत्राचं उल्लंघन केलं. पाकिस्तानी सैन्याने गोळीबारही सुरुच ठेवला होता. नियंत्रण रेषेजवळ हा गोळीबार सुरु होता. घुसखोरी करण्यासाठी ३०० ते ४०० ड्रोन वापरण्यात आले. मात्र भारतीय सशस्त्र दलांनी अनेक ड्रोन्स पाडले. हे ड्रोन इतक्या मोठ्या प्रमाणावर धाडण्याचं कारण आपल्या देशातली गुप्त माहिती मिळवणं असा होता. ड्रोनचा जो ढिगारा आहे त्याचा फॉरेन्सिक तपास केला जातो आहे. प्राथमिक अहवालावरुन असं कळतंय की हे तुर्की ड्रोन आहेत. पाकिस्तानच्या एका सशस्त्र युव्हीने भटिंडा स्टेशनवर लक्ष्य साधलं होतं. मात्र ते निष्क्रिय करण्यात आलं. चार ठिकाणी सशस्त्र ड्रोन लाँच केलं होतं.
नागरी हवाई हद्द पाकिस्तान ढालीप्रमाणे वापरतो आहे-सोफिया कुरेशी
उरी, अखनूर, पूँछ, सशस्त्र ड्रोन्स यांचा उपयोग करुन गोळीबार केला. त्यानंतर भारताने चोख प्रत्युत्तर दिलं गेलं. त्यांचंही मोठं नुकसान आपल्या देशाने केलं. पाकिस्तानचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा दिसून आला. ७ मे च्या रात्री एक ड्रोन हल्ला केल्यानंतर पाकिस्तानने नागरी हवामान क्षेत्र बंद केलं नाही. पाकिस्तान ते एखाद्या ढालीसारखं वापरतो आहे. असंही सोफिया कुरेशींनी सांगितलं.

भारताने पाकिस्तानला जे उत्तर दिलं ते जबाबदारीने आणि संयम राखून दिलं. पाकिस्तानने जे हल्ले केले त्यात काही जवानांचा मृत्यू झाला तर काही जवान जखमी झाले आहेत. अशीही माहिती सोफिया कुरेशी यांनी दिली. पाकिस्तान सातत्याने खोटारडेपणा करतो आहे. भारतात धार्मिक तेढ निर्माण झाली पाहिजे म्हणून तशा पद्धतीने अफवाही पसरवल्या जात आहेत. त्या पसरवू नका असंही आवाहन यावेळी करण्यात आलं.