Sofiya Qureshi BJP Leader Vijay Shah Case: ऑपरेशन सिंदूरनंतर कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी भाजपाचे मंत्री कुंवर विजय शाह यांच्याविरोधात खटला गुन्हा दाखल केला होता. यानंतर शाह यांच्या अटकेला स्थगिती देण्याचे अंतरिम निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज कायम ठेवले आहेत.

याचबरोबर स्वतः या प्रकरणाची दखल घेतल्यामुळे, सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश उच्च न्यायालयाला त्यांच्यासमोर प्रलंबित असलेली या प्रकरणातील कार्यवाही बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी माहिती दिली की, मागील आदेशानुसार, शाह यांच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन अधिकाऱ्यांचा समावेश असलेले विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे आणि याचा तपास सुरू आहे.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने भोपाळच्या पोलीस उपमहानिरीक्षकांनी दाखल केलेल्या स्थिती अहवालाची दखल घेतली आहे.

या अहवालामध्ये असे म्हटले आहे की, “एसआयटीने २१ मे रोजी घटनास्थळाला भेट दिली आणि तपास केला. त्यानंतर, काही अधिक पुरावे गोळा करण्यात आले आहेत. यामध्ये मोबाईल फोनसह इतर गोष्टीही जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात असल्याने, चौकशीसाठी आणखी वेळ मिळावा.”

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर शाह यांनी दाखल केलेल्या दोन याचिकांवर सुनावणी पार पडली.

यातील पहिल्या याचिकेत शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांना “दहशतवाद्यांची बहीण” म्हणून संबोधल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याच्या मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. याबाबत लाईव्ह लॉने वृत्त दिले आहे.

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी दहशतवादी तळांवर केलेल्या लष्करी कारवाईची पत्रकार परिषदेच्या माध्यामातून माहिती देणाऱ्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यासह कर्नल सोफिया कुरेशीही ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा बनल्या होत्या.

काय म्हणाले होते विजय शाह?

यानंतर १२ मे रोजी विजय शाह यांनी माऊ येथील एका कार्यक्रमात बोलताना भारताने पाकिस्तानला धडा शिकवल्याचा उल्लेख केला होता. “पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना भारताने त्यांच्या बहिणीच्याच माध्यमातून धडा शिकवला”, असे विधान त्यांनी केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी विजय शाह यांनी कुणाचेही नाव घेतले नसले, तरी त्यांचा रोख कर्नल सोफिया कुरेशी यांच्याच दिशेने होता, असा आरोप काँग्रेसने केला आहे.