दिल्लीत धर्माच्या नावाखाली विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणाऱ्या स्वामी चैतन्यानंद या उर्फ पार्थसारथी या स्वयंघोषित बाबाचा पर्दाफाश झाला आहे. आश्रमात शिकणाऱ्या १७ विद्यार्थिनींनी अश्लील मेसेज आणि या बाबाचे लैंगिक छळाचे प्रकार यांना वाचा फोडली आहे. आता या बाबाचे मेसेजही पोलिसांनी समोर आणले आहेत. माझ्या खोलीत आलीस आणि माझं ऐकलंस तर तुला परदेशात घेऊन जाईन असा आणि यासारखे काही मेसेज हा बाबा करत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी काय सांगितलं?

पोलिसांनी सांगितलं “एकूण ३२ विद्यार्थिनींनी पार्थसारथीविरोधात तक्रार दाखल केली असून त्यापैकी १७ मुलींनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या मुलींनी लेखी स्वरुपात तक्रार दाखल केली आहे. चैत्यनानंद त्यांना अश्लील मेसेजेस पाठवत होता, त्यांच्याशी अश्लील भाषेत बोलत होता, चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता, असं या मुलींनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे. त्यानुसार पार्थसारथीविरोधात आम्ही गुन्हा दाखल केला आहे.” पोलिसांनी सांगितलं की “विद्यार्थिनींनी तक्रार केली आहे की आश्रमातील महिला शिक्षिका, कर्मचारी व वॉर्डन बाबाच्या आदेशांचं पालन करण्यास सांगत होते. अनेकदा बाबा सांगेल तसं करावं यासाठी दबाव टाकला जात होता. या सर्वांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.”

पार्थसारथी काय मेसेज पाठवायचा?

माझ्या खोलीत ये… मी तुला परदेशात ट्रीपला घेऊन जाईन. तिथे तुला पैसेही भरावे लागणार नाहीत. अशा प्रकारचे मजकूर आणि यापेक्षा घाणेरडे आणि अश्लील मजकूर चैतन्यानंद सरस्वती तरुणींना पाठवत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या मोबाइलवर ५० महिलांना त्याने अशा प्रकारे मेसेज पाठवले आहेत असं समोर आलं आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार हा बाबा शरीरसंबंध ठेवण्यासाठी विविध आमिषं दाखवून या महिलांना आणि विद्यार्थिनींना मेसेज पाठवत होता.

मुलींना नापास करण्याचेही मेसेज पाठवल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका विद्यार्थिनीला त्याने मेसेज पाठवला होता की जर तू माझं ऐकलं नाहीस आणि माझ्या खोलीत आली नाहीस तर तुझे परीक्षेतले गुण कमी करेन. तू माझ्या आज्ञा पाळल्या नाहीस तर तुला नापास करेन अशाही धमक्या तो विद्यार्थिनींना देत होता. या बाबाने फोनवरुन केलेले अनेक मेसेज डिलिट केले होते. मात्र पोलिसांनी ते रिट्राइव्ह केले आहेत.

कोण आहे चैतन्यानंद सरस्वती?

चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थसारथी हा श्री शारदा इन्स्टिट्युट ऑफ इंडियन मॅनेजमेंटचा संचालक आहे. या संस्थेला AICTE ची मान्यता मिळाली आहे. तसंच ही संस्था शृंगेरी पीठाच्या अखत्यारीत आहे. स्वामी चैतन्यानंद याला या संस्थेचा संचालक म्हणून नेमण्यात आलं होतं. आता १७ विद्यार्थिनींनी तक्रार केल्यानंतर हा बाबा फरार झाला आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. दरम्यान या स्वयंघोषित बाबावर २००९ आणि २०१६ या दोन्ही वर्षांमध्ये गुन्हे दाखल झाले होते. हे गुन्हे लैंगिक शोषणाचे आहेत. २००९ मध्ये दिल्लीतल्या डिफेन्स कॉलनीत या बाबावर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल आहे. तर २०१६ मध्ये वसंत कुंज भागातील एका महिलेने या बाबाच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती.