पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिमिक्रीमुळे प्रसिद्ध झालेला कॉमेडियन श्याम रंगीलाने आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. गुरुवारी श्याम रंगीलाने आम आदमी पक्षात प्रवेश केला. आपचे राजस्थानचे प्रभारी विनय मिश्रा यांनी श्याम रंगीलाला पक्षाचे सदस्यत्व दिले. यावेळी श्याम रंगीलाने आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांचे कौतुक केले. आम आदमी पक्षाशिवाय असा कोणताही पक्ष किंवा नेता पाहिला नाही, जो म्हणतो की, तुम्हाला माझे काम आवडत नसेल, तर पुढच्या वेळी मला मत देऊ नका. त्यांच्यामुळे मी प्रभावित झालो आणि त्यामुळेच मी पक्षात प्रवेश करत आहे, असे श्याम रंगीलाने म्हटले आहे.

श्याम रंगीला म्हणाला की, त्यांनी स्वतंत्रपणे काम करण्याचे आवाहन केल्याने पक्षाने मला सध्या कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. आम आदमी पक्षानेही श्याम रंगीला पक्षात प्रवेश केल्याची माहिती दिली आहे. आपने याबाबत एक ट्विट केले आहे.

“राजस्थानचा प्रसिद्ध विनोदी अभिनेता श्याम रंगीला आम आदमी पार्टीत सामील झाला आहे. श्याम रंगीला आपल्या कॉमेडीच्या माध्यमातून लोकांच्या दुःखी चेहऱ्यावर हसू आणत आहेत. आता तो आपल्या कलेतून आम आदमी पक्षाच्या वतीने आरोग्य आणि शिक्षण क्रांतीबद्दल लोकांना सांगणार असून त्यांना जागरूक करण्याचे काम करणार आहे. आम आदमी पार्टी देशात कामाचे राजकारण करत आहे,” असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या कार्याचे कौतुक करताना श्याम रंगीला म्हणाला की, “इतर पक्षांप्रमाणे ते आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण करत नाहीत. पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या विजयापूर्वीही मी ‘आप’ला पाठिंबा देत होतो. याचे कारण त्यांनी दिल्लीत केलेले काम आहे.” श्याम रंगीलाने राजस्थानमध्येही ‘आप’ येण्याची आशा व्यक्त केली आहे. “राजस्थानची जनताही बदलाकडे पाहत आहे. यावेळी त्यांना तुम्हाला संधी द्यायची आहे. जर तुम्ही चांगले केले नाही तर पाच वर्षांनंतर लोक पुन्हा एकदा बदलू शकतात आणि मी स्वतः त्यांना पाठिंबा देईन,” असे रंगीला म्हणाला.