पीटीआय, नवी दिल्ली

भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार करारावर अमेरिकी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा सकारात्मक झाल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले. दोन्ही बाजूंनी परस्पर फायदेशीर व्यापार करार करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार करारावर वाटाघाटी करण्यासाठी ट्रम्प प्रशासनातर्फे ब्रेंडन लिंच यांच्या नेतृत्वाखालील पथक भारतात आले आहे. ब्रेंडन लिंच यांच्याशी झालेल्या चर्चा सकारात्मक आणि भविष्यसूचक होत्या, असे वाणिज्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. भारताच्या बाजूने वाणिज्य विभागाचे विशेष सचिव राजेश अग्रवाल यांनी चर्चेचे नेतृत्व केले. अमेरिकेने भारतावर ५० टक्के आयातशुल्क लादल्याने दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे ही चर्चा महत्त्वाची आहे.

दोन्ही देशांमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे यापुढे चर्चा सुरू राहतील आणि पुढील प्रत्यक्ष बैठकीसाठी परस्पर सोयीस्कर तारीख ठरवण्यात येईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. परस्पर फायदेशीर व्यापार करार लवकरच करण्यासाठी तातडीचे प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

द्विपक्षीय व्यापार कराराबाबत आतापर्यंत चर्चेच्या पाच फेऱ्या पार पडल्या आहेत. सहावी फेरी २५ ते २९ ऑगस्टदरम्यान होणार होती, मात्र भारतावर ५० टक्के आयातशुल्क लादले गेल्यानंतर ती पुढे ढकलण्यात आली.