संकेतस्थळांच्या माध्यमातून भारतात होणाऱ्या अनुचित व्यापारासंबंधी सुरू असलेल्या चौकशीत योग्य ती माहिती देण्यात अपयशी ठरल्याबद्दल भारतीय स्पर्धा नियमन आयोगाने गुगल या प्रसिद्ध कंपनीला एक कोटीचा दंड ठोठावला आहे. तसेच व्यापार निरीक्षकांनीदेखील कंपनीला तपासकार्यात सहकार्य करण्याची सूचना केली आहे.
चौकशीदरम्यान हवी असलेली माहिती आणि कागदपत्रे सादर करण्यात न आल्यामुळे गुगलला एक कोटींचा दंड ठोठावण्यात आल्याचे गुरुवारी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले. स्पर्धा नियमन आयोगाने ठोठावलेल्या दंडाबाबत गुगलच्या प्रवक्त्याने नाराजी व्यक्त केली आहे.
‘मॅट्रीमोनी डॉट कॉम’ आणि ‘कन्झ्युमर युनिटी अ‍ॅण्ड ट्रस्ट सोसायटी’ यांनी गुगलविरोधात तक्रार केली होती. गुगल ऑनलाइन व्यापारसंबंधी आणि जाहिरात क्षेत्राशी निगडित बाजाराचा दुरुपयोग करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी तपास करणाऱ्या यंत्रणांना सर्वतोपरी साहाय्य करावे, असे आदेश भारतीय स्पर्धा नियमन आयोगाने दिले असल्याचे कार्मिक मंत्रालयाने स्पष्ट केले.