पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी जम्मू काश्मीरचा उल्लेख करताना ‘ते राज्य पाकिस्तानचे महत्त्वाचे अंग आहे’ असा केला. मात्र त्याविरोधात भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोघांनीही दंड थोपटले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी सरकारी प्रतिनिधींच्या वक्तव्यामुळे भारतातील सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आल्याचे दृष्य यामुळे निर्माण झाले आहे.
जम्मू आणि काश्मीर राज्य हे भारताचे अविभाज्य अंग आहे. आणि काश्मीरच्या मालकीविषयी दावा करण्याची आढय़ताखोरी करणे ही पाकिस्तानी लष्करप्रमुखांची परंपरा आहे. त्यामुळे त्यांच्या विधानास फारशी किंमत देण्याची गरज नाही, असे प्रतिपादन भारताचे अर्थमंत्री पी. चिदम्बरम् यांनी व्यक्त केली. आम्ही हे विधान फेटाळून लावत आहेत. पाकिस्तानच्या या मुजोरीचा आम्ही निषेध करीत आहोत, असेही अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जम्मू-काश्मीरमधील जनतेने सहभाग घेतला होता, ही बाब पाकिस्तानसह आपण सगळेच जाणतो, असेही अर्थमंत्री म्हणाले.
भाजपनेही पाकिस्तानच्या मुजोर वृत्तीवर टीकास्त्र सोडले. पाकिस्तानकडून भारताच्या वारंवार कुरापती काढल्या जातात. भाजप त्याचा कडाडून निषेध करीत आहे. उभय देशांमधील संबंध शांततामय राहावेत अशी जर पाकिस्तानशी इच्छा असेल तर, पाकिस्तानने असले चाळे करणे थांबवावे, अशा शब्दांत भाजपच्या प्रवक्त्या निर्मला सीतारामन् यांनी पाकिस्तानवर टीका केली. तसेच पाकिस्तानच्या पंतप्रधानांना जर भारताशी संबंध चांगले हवे असतील तर त्यांनी स्वतहून लष्करप्रमुखांचे विधान फेटाळून लावावे आणि त्यांना खडसवावे, अशी मागणीही भाजपने केली.
जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील असेही भाजपने ठणकावले.
पाकिस्तानची मुक्ताफळे
काश्मीरी जनतेने पाकिस्तानसाठी केलेला त्याग अपूर्व आहे. तो फुकट जाणार नाही. हे राज्य पाकिस्तानचा अविभाज्य भाग आहे. काश्मीर प्रश्न हा आंतरराष्ट्रीय व्यासपीठाने दखल घेतलेला महत्त्वाचा प्रश्न आहे, अशा शब्दात पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी या राज्याबद्दल भाष्य केले होते.