बंगळूरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी शनिवारी प्रसिद्ध झाली. निवडणुकीनंतर सत्ता आल्यास मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि विधिमंडळ पक्षनेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. येत्या मेमध्ये ही निवडणूक होणार आहे. आणखी १०० जागांसाठी नावे अद्याप निश्चित झालेली नाहीत. कर्नाटकात एकूण २२४ विधानसभा मतदारसंघ आहेत. शिवकुमार त्यांच्या कनकापुरा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
सिद्धरामय्या म्हैसूर जिल्ह्यातील वरुणा या त्यांच्या मूळ मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. सध्या त्यांचे पुत्र डॉ. यितद्र सिद्धरामय्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. १२४ उमेदवारांच्या जाहीर झालेल्या या पहिल्या यादीत यितद्र यांचे नाव नाही. बागलकोट जिल्ह्यातील बदामीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सिद्धरामय्या यांनी कोलारमधून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते; परंतु पक्षनेतृत्वाने त्यांना जोखमीबद्दल सावध केल्यानंतर निर्णय मागे घेतला. वरुणा येथून सिद्धरामय्यांची उमेदवारी निश्चित झाली तरी सिद्धरामय्यांनी दोन जागांवरून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.