Bihar elections 2025 : बिहारचे डबल इंजिन सरकार दिल्लीमधून चालवले जात असून राज्याची जनता किंवा मुख्यमंत्री नितीशकुमार यांना आदर मिळत नसल्याची टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी शनिवारी केली. राज्यात गेल्या दोन दशकांपासून सत्ता असतानाही राष्ट्रीय लोकशाही आघाडीने निवडणुकीतील आश्वासने पूर्ण केलेली नाहीत, अशी टीका त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली. राज्यात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बिहारमध्ये निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रियंका गांधी शनिवारी पहिल्यांदा प्रचारात सहभागी झाल्या. त्या बेगुसराय आणि खगारिया येथे सभा घेणार होत्या. मात्र, वाईट हवामानामुळे हेलिकॉप्टरचे उड्डाण होऊ शकले नाही या कारणामुळे खगारिया येथील सभा रद्द करण्यात आली. पाटण्याहून रस्ता मार्गाने प्रवास करून त्या बेगुसरायला पोहोचल्या आणि तिथे त्यांनी सभा घेतली.
बेगुसरायमध्ये आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात प्रियंका यांनी सत्ताधारी रालोआवर टीका केली. राज्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती असतानाही, येथील जनता दारिद्र्यात असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी डबल इंजिन सरकारबद्दल बोलत असले तरी त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. येथे केवळ एकच इंजिन आहे आणि ते दिल्लीहून चालवले जाते. बिहारी जनतेला आपल्या समस्या मांडण्यासाठी कोणतेही व्यासपीठ नाही. नितीशकुमार यांनाही केंद्राकडून आदर मिळत नाही. – प्रियंका गांधी, नेत्या, काँग्रेस
