करोनामुळे गुजरातमध्ये भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः अहमदाबाद शहरातील करोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केलं आहे. “गुजरात व अहमदाबादमध्ये लोकांचा मृत्यू होऊ लागला आहे. २२ वर्षांपासून सत्तेत असलेलं भाजपा सरकार लोकांना वाचवण्या अपयशी ठरलं आहे,” अशी आरोप गुजरात काँग्रेसनं केला आहे.

गुजरातमध्ये करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित चावडा यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. करोनामुळे दिल्लीतील स्थिती चिंताजनक बनली आहे. त्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी बैठका घेत उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना केल्या. तसेच दिल्लीतील रुग्णालयांची पाहणी केली. त्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयानं ट्विटर हॅण्डलवरून दिली. या ट्विटच हवाला देत अमित चावडा यांनी नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.

आणखी वाचा- “लोकांनी आत्मनिर्भर व्हावं असं वाटत असेल, तर त्यांच्या मार्गात आर्थिक अडथळे आणू नका”

“गुजरात व विशेषतः अहमदाबादमध्ये लोक मरण पावत आहेत. २२ वर्षांपासून सत्तेत असलेलं भाजपाचं सरकार करोनापासून लोकांना वाचवण्यात अपयशी ठरलं आहे. अमित शाह, नरेंद्र मोदीजी, ज्या गुजराती लोकांनी तुम्हाला दिल्लीपर्यंत पोहोचवलं, ते गुजराती लोक आज मरू लागले आहे. सरकारने सगळं देवाच्या भरवशावर सोडलं आहे. त्यांच्यासाठी तुम्ही काय मदत केली?”, असा सवाल चावडा यांनी मोदी, शाह यांना केला आहे.

गुजरातमधील करोनामुळे भयावह स्थिती निर्माण झाली आहे. गुजरातमधील बाधित रुग्णांची संख्या वाढत असून, मागील २४ तासात ५१४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत, तर २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे. सोमवारी शहरात ३२७ जणांना करोना झाल्याचं निष्पन्न झालं. दिवसभरात २३ जणांचा मृत्यू झाला आहे.