आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पोस्ट लिहिली होती. त्या पोस्टवरुन काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत आक्रमक झाल्या आहेत. सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या ज्यांनी ज्यांनी भारत पाकिस्तानचा क्रिकेटचा सामना पाहिला त्यांना देशभक्तीचा अर्थच समजला नाही. एक पोस्ट करुन सुप्रिया श्रीनेत यांनी पंतप्रधान मोदींवर आणि सामना पाहणाऱ्यांवर टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पोस्ट काय?

भारतीय क्रिकेट संघाने आशिया चषकात सलग तिसऱ्यांदा पाकिस्तानवर विजय मिळवत एक नवा विक्रम प्रस्थापित केला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट केली. “ऑपरेशन सिंदूर असो किंवा खेळाचे मैदान निकाल एकच…. तो म्हणजे भारताचा विजय”, असा टोला लगावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन व्यक्त केले.

सुप्रिया श्रीनेत यांची पोस्ट काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या पोस्टवरुन आता सुप्रिया श्रीनेत आक्रमक झाल्या आहेत. सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या, ज्यांनी ज्यांनी भारत पाकिस्तानचा सामना पाहिला आणि विजयोत्सव साजरा केला त्यांच्यापैकी कुणीच देशावर प्रेम करत नाही. ज्या महिलांचा सिंदूर पुसला गेला त्यांच्याबाबत कुणाला प्रश्न पडला नाही का? नरेंद्र मोदी यांनी सीमेवर आपले प्राण गमावणाऱ्या सैनिकांची तुलना क्रिकेटर्सशी करुन बेशरमपणाचा कळस गाठला आहे अशीही टीका सुप्रिया श्रीनेत यांनी केली.

दहशतवादी देशाबरोबर कशाला क्रिकेट खेळायचं?

सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या जर तुमचं तुमच्या देशावर प्रेम असतं तर दहशतवादी देश पाकिस्तानबरोबर भारताने क्रिकेट खेळणंच मान्य केलं नसतं. हिमांशी नरवाल किंवा ऐश्वर्या द्विवेदी यांच्या चेहरे तुमच्या समोर आले नाहीत का? १७ जवान पूँछ मध्ये शहीद झाले त्यांचं काय? शिवाय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्वीट वाचलं आणि मला विश्वासच बसला नाही. तुम्ही ऑपरेशन सिंदूर आणि क्रिकेट मॅचशी कशी काय करु शकता? लष्करातला जवान आपले प्राण पणाला लावून देशासाठी कार्यरत असतो. प्रसंगी तो शहीदही होतो. अशा वीरांची तुलना तुम्ही क्रिकेटर्सशी कशी काय करु शकता? पाकिस्तानशी क्रिकेट खेळून तुम्ही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पैसे कमावू दिले. हाच पैसा वापरुन आता ते दहशतवाद्यांना पोसतील आणि तेच दहशतवादी पुन्हा भारतावर हल्ला करतील. तुम्ही ट्वीट करत आहात तुम्हाला शरम वाटली पाहिजे की ऑपरेशन सिंदूरची तुलना तुम्ही क्रिकेटशी करत आहात. खून और पानी एक साथ नहीं चलेगा म्हणणाऱ्या पंतप्रधानांना क्रिकेट कसं काय चालतं? सोनम वांगचुकला तुम्ही का अटक केली आहे? ज्या दहशवादी देशाला धडा शिकवला पाहिजे त्यांच्याशी तुम्ही शस्त्रसंधी केलीत तुम्हाला लाज वाटली पाहिजे मोदी. असं सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या.