PM Modi On GST Rationalization: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) सुसूत्रीकरणावर बोलताना प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसवर जोरदार टीका केली आणि म्हटले की, काँग्रेसने दैनंदिन जीवनावश्यक वस्तू, अन्न आणि औषध यासारख्या वाटेल त्या गोष्टींवर कर लादला होता.

दरम्यान, जीएसटी सुसूत्रीकरणावर काँग्रेसने टीका केली आहे. काँग्रेसने म्हटले आहे की, केंद्र सरकारने जीएसटीमध्ये आठ वर्षे उशिराने सुसूत्रीकरण आणले आहे. बिहारमधील येत्या विधानसभा निवडणुका आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या ५० टक्के टॅरिफसह अनेक मुद्द्यांवर अंदाज लावत, या अचानक उचललेल्या पावलामागे काय काय आहे, असा प्रश्नही काँग्रेसने उपस्थित केला आहे.

जीएसटी सुसूत्रीकरण आणि काँग्रेसच्या टीकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “मी २०१४ मध्ये सत्तेत येण्यापूर्वी, स्वयंपाकघरातील भांडी असोत किंवा शेतीच्या वस्तू असोत, औषधे असोत किंवा अगदी जीवन विमा असोत, काँग्रेस सरकारने अशा विविध गोष्टींवर वेगवेगळे कर लादले होते.”

“टूथपेस्ट, साबण, केसांच्या तेलावर २७ टक्के कर, अन्नाच्या प्लेट्स, कप, चमच्यांवर १८ ते २८% कर आणि टूथ पावडरवर १७ टक्के कर आकारायचे. इतकेच नव्हे तर काँग्रेसचे लोक मुलांच्या टॉफीवरही २१ टक्के कर घेत असत”, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

“देशातील कोट्यवधी लोकांची प्राथमिक गरज असलेल्या साध्या सायकलवर ते १७ टक्के कर आकारत असत. याचबरोबर लाखो माता आणि बहिणींसाठी स्वाभिमान आणि स्वयंरोजगाराचे साधन असलेल्या शिलाई मशीनवरही काँग्रेसने १६ टक्के कर लादला होता”, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

काँग्रेसवर घाणाघात करत पंतप्रधान यावेळी म्हणाले की, “काँग्रेसने सर्वसामान्यांसाठी घरे बांधणे देखील कठीण केले होते. कारण ते सिमेंटवर २९ टक्के कर आकारत होते. याचबरोबर मध्यमवर्गीयांसाठी प्रवास आणि पर्यटनही खूप कठीण बनवले होते. ते हॉटेलच्या खोल्यांवर १४ टक्के आकारायचे. त्यांनी एअर कंडिशनर, टेलिव्हिजन आणि, पंखे यासारख्या वस्तूंवरही ३१ टक्के कर लादला होता.”

जीएसटी कौन्सिलने काल जाहीर केलेल्या जीएसटी सुसूत्रीकरणाच्या माध्यामातून जीएसटी दराचे दोन टप्पे वगळून ते ५ टक्के आणि १८ टक्के असे करण्यात आले आहेत. यामुळे अन्न, औषधे, जीवनावश्यक वस्तू, शेतीच्या वस्तू, हरित ऊर्जा, लहान कार आणि सायकली यासह अनेक वस्तूंवरील कर कमी होणार आहेत.