तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी काँग्रेसलाच घरचा आहेर देत टीका केली होती. सनातन धर्मावर टीका केल्यामुळे काँग्रेसला पराभवाचे तोंड पाहावे लागले, असे आचार्य प्रमोद म्हणाले होते. काँग्रेस पक्षात डाव्या विचारसरणीच्या नेत्यांना प्रवेश दिल्यामुळे काँग्रेसच्या विचारांचे पतन झाले आहे, असेही ते म्हणाले होते. पण आता त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची स्तुती केली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा मणिपूरमधून सुरू होणार आहे. मात्र मणिपूर सरकारने सुरक्षेचे कारण पुढे करत यात्रेला परवानगी नाकारली आहे. त्यानंतर आचार्य प्रमोद यांनी मणिपूर सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत असताना आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले की, “या देशात यात्रा काढण्यासाठी राहुल गांधी यांना कुणाच्याही परवानगीची गरज नाही. राहुल गांधी शांतीचे ध्वज वाहक आहेत. भारत जोडोनंतर ते भारत न्याय यात्रा काढत आहेत. राहुल गांधी मोठे तपस्वी आहेत. तपस्वीच्या यात्रेसाठी मणिपूर सरकार परवानगी देत नाही, हा अन्याय, अधर्म आहे. आम्ही याच्याविरोधात आवाज उचलू. भाजपाला वाटतं राहुल गांधी यांनी कुठेच जाऊ नये. भाजपा जर कोणत्या नेत्याला घाबरत असेल तर ते राहुल गांधी आहेत.”

हे वाचा >> “काही काँग्रेस नेते श्रीरामाचा आणि हिंदूंचा…”, आचार्य प्रमोद कृष्णम यांचा पक्षाला घरचा आहेर

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणूगोपाल यांनी पत्रकार परिषद घेऊन मणिपूर सरकारने परवानगी नाकारल्याची माहिती दिली. ते म्हणाले, “मणिपूरचे आमचे प्रदेशाध्यक्ष मेघचंद्र यांनी मणिपूरच्या मुख्य सचिवांकडे यात्रेसाठी परवानगी मागितली होती. पाच दिवसांनंतर उत्तर देऊ, असे मुख्य सचिवांनी सांगितले. पाच दिवसांनी मेघचंद्र पुन्हा मुख्य सचिवांना जाऊन भेटले. पण सचिवांनी उत्तर दिले नाही. आज सकाळी आम्हाला कळले की, मणिपूर सरकारने यात्रेसाठी परवानगी नाकारली आहे. आमची यात्रा राजकीय नाही. आम्ही पूर्व ते पश्चिम दिशा असा यात्रेचा प्रवास ठरविला होता. मणिपूरच्या परिस्थितीचा आम्हाला राजकीय लाभ उचलायचा नाही. तरीही आम्ही मणिपूरमधूनच यात्रेला सुरूवात करू”

यावेळी आचार्य प्रमोद यांनी विविध विषयावर भाष्य केले. तृणमूल काँग्रेसने राम मंदिर उदघाटन सोहळ्याला ‘नौटंकी’ म्हटले होते. त्यावर बोलताना आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले की, तृणमूल काँग्रेस हा पक्ष सर्वात मोठा नाटकी पक्ष आहे. कधी ते पंतप्रधान मोदींची प्रशंसा करतात, कधी ते विरोध करतात. कधी ते ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करतात, कधी सीबीआयच्या लोकांना तुरुंगात डांबतात. आमचे नेते अधीर रंजन चौधरी सांगतात ममता बॅनर्जी आणि भाजपा यांचे साटेलोटे आहे.

आणखी वाचा >> “सनातन धर्माने काँग्रेसला बुडवले”, पक्षातील ज्येष्ठ नेत्यानं दिला घरचा आहेर; म्हणाले, “लवकरच एमआयएम..”

समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य हे वारंवार वादग्रस्त टीका करत असतात, त्यांच्यावर बोलत असताना आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले की, समाजवादी पक्ष आणि स्वामी प्रसाद मौर्य यांची गोष्ट विक्रम-वेताळप्रमाणे झालेली आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांचे भूत अखिलेश यादव यांच्या मानगुटीवर बसले आहे. अखिलेश यादव हे स्वामी प्रसाद मौर्यांना घाबरतात. मौर्य यांच्या विधानामुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला सत्तेत येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, हे समाजवादी पक्ष आणि अखिलेश यादव यांनाही माहीत आहे.