देशभरातील विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने मुंबईत समन्वय समितीची घोषणा झाल्यानंतर बुधवारी (१३ सप्टेंबर) दिल्लीत शरद पवारांच्या घरी या समन्वय समितीची पहिली बैठक झाली. या बैठकीत समितीने महत्त्वाचे निर्णय घेतले. यात आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या विषयाचाही समावेश आहे. काँग्रेसचे सरचिटणीस आणि समन्वय समितीचे सदस्य के. सी. वेणुगोपाल यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली.

के. सी. वेणुगोपाल इंडिया आघाडीच्या जागावाटपाबाबत माहिती देत म्हणाले, “समन्वय समितीने ठरवलं आहे की, जागा वाटपाची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला. विविध पक्षांचे सदस्य बैठका घेऊन जागावाटप लवकरात लवकर निश्चित करतील.”

“भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राजकीय सुडाच्या भावनेने कारवाई”

इंडिया आघाडीच्या बैठकीची माहिती देताना के. सी. वेणुगोपाल म्हणाले, “आज शरद पवार यांच्या घरी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक झाली. यात १२ पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. तृणमूल काँग्रेसचे अभिजीत बॅनर्जी यांना ईडीने समन्स पाठवल्याने या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकीय सुडाच्या भावनेने ही कारवाई केली आहे.”

हेही वाचा : VIDEO: शरद पवारांच्या घरी ‘इंडिया’ समन्वय समितीच्या पहिल्या बैठकीनंतर मोठी घोषणा; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“देशातील विविध भागात जाहीर सभा घेण्याचा निर्णय”

“समन्वय समितीने देशातील विविध भागात जाहीर सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. पहिली जाहीर सभा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल. या सभेत वाढती महागाई, बेरोजगारी आणि भाजपाच्या भ्रष्टाचाराचे मुद्दे असतील. याशिवाय समन्वय समितीने जातनिहाय गणनेचा विषयही चर्चेत घेतला,” अशी माहिती के. सी. वेणुगोपाल यांनी दिली.