काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार दिग्विजय सिंह यांनी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर(PFI) होत असलेल्या कारवाईवरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) निशाणा साधला आहे. “एक ही थाली के चट्टे-बट्टे” असे म्हणत सिंह यांनी आरएसएसची तुलना पीएएफआयशी केली आहे. द्वेष आणि हिंसाचार पसरवणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेवर (VHP) कारवाई का करण्यात येत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

भारताला ‘मुस्लीम राष्ट्र’ बनवण्याचा कट; ‘पीएफआय’बाबत ‘एनआयए’चा दावा : तरुणांना दहशतवादी कारवायांत ओढण्याचे प्रयत्न

मध्य प्रदेशातील ग्वालियरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा हल्लाबोल केला आहे. २२ सप्टेंबरला एनआयए (NIA) आणि सक्तवसुली संचालनालयाने (ED) ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमधील ठिकाणांवर छापेमारी केली. याप्रकरणी तपास यंत्रणांनी पीएफआयच्या जवळपास १०० सदस्यांना अटक केली आहे. दहशतवादी कारवायांना आर्थिक साहाय्य केल्याचा या संघटनेवर आरोप आहे.

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा भाजपालाच होतो फायदा – सचिन सावंतांचं विधान!

मुस्लीम तरुणांना ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी फूस लावून भारताला मुस्लीम राष्ट्र बनवण्याचा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा कट होता, असा दावा राष्ट्रीय तपास संस्थेने शनिवारी केला आहे. ‘पीएफआय’चे नेते आणि कार्यकर्ते अनेक बेकायदा कारवायांमध्ये गुंतल्याचा ठपका ‘एनआयए’ने ठेवला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘पीएफआय’विरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या कारवाई विरोधात पुण्यात मुस्लीम समुदायातील काही व्यक्तींनी शनिवारी आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’चे नारे देण्यात आले. या घटनेमुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे. या घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.