गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील राजकीय नेतेमंडळी सीमाप्रश्नावरून एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं आहे. कर्नाटकमधील राजकारण्यांची वक्तव्य महाराष्ट्राचा अवमान करणारी असल्याची टीका महाराष्ट्रातील नेत्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्याचं वक्तव्य सध्या वादात सापडलं आहे. हे वक्तव्य महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत नसून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आहे. त्यामुळे कर्नाटकमधील राजकारण पुन्हा एकदा देशपातळीवर चर्चेचा विषय ठरलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माजी मुख्यमंत्री म्हणतायत, “हिंदुत्व घटनाविरोधी!”

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरीष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी हिंदुत्वासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. “हिंदुत्व हे घटनाविरोधी आहे. हिंदुत्व आणि हिंदू धर्म या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी हिंदू धर्माच्या विरोधी नाही. मीही एक हिंदू आहे. पण माझा हिंदुत्व आणि मनुवादाला विरोध आहे”, असं सिद्धरामय्या एका कार्यक्रमात म्हणाले आहेत. “कोणत्याही धर्मात हत्या आणि हिंसेचं समर्थन होत नाही. पण हिंदुत्वात हत्या, हिंसा आणि भेदभाव या गोष्टींना पाठिंबा दिला जातो”,असंही सिद्धरामय्या यांनी नमूद केलं.

“बहुधा आपल्यापैकी बहुतेकजण हिंदुत्वविरोधी”

दरम्यान, कलबुर्गीमध्ये झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकांना उद्देशून सिद्धरामय्यांनी मोठा दावा केला आहे. “बहुतेक आपल्यापैकी बहुतेकजण हिंदुत्वविरोधी आहेत”, असं ते म्हणाले आहेत. “मी एक हिंदू आहे. मी कसा हिंदूविरोधी असू शकतो? माझा हिंदुत्व आणि त्याअनुषंगाने केलं जाणारं राजकारण याला विरोध आहे. भारतीय राज्यघटनेनुसार सर्व धर्मांच्या श्रद्धा या समान आहेत”, असंही सिद्धरामय्यांनी नमूद केलं.

नागपूर: न्यायाधीशांच्या निवडीत हस्तक्षेप म्हणजे न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याला धोका; निवृत्त मुख्य न्यायाधीश भूषण धर्माधिकारी यांचे मत

भाजपाच्या आरोपांना प्रत्युत्तर

सिद्धरामय्या यांनी भाजपाकडून त्यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेला प्रत्युत्तरादाखल वरील प्रतिक्रिया दिली आहे. सिद्धरामय्यांवर भाजपाकडून हिंदूविरोधी असल्याची टीका करण्यात येत आहे. भाजपाचे राष्ट्रीय सचिव सी. टी. रवी यांनी याआधी सिद्धरामय्या यांचा उल्लेख ‘सिद्धरामुल्ला खान’ असा केल्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. सिद्धरामय्या यांनी यंदाची कर्नाटक विधानसभा निवडणूक आपली शेवटची निवडणूक असेल असं जाहीर केल्यानंतर त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. त्यानंतर आता त्यांचं हिंदुत्वाविषयीचं विधान चर्चेत आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader siddaramaiah claims hindutva is against constitution pmw
First published on: 06-02-2023 at 12:25 IST