करोना काळामध्ये भारतातून मोठ्या प्रमाणावर औषधं आणि लसींची निर्यात झाली. त्यामुळे जगभरात भारताची ओळख जगातला अग्रेसर औषध पुरवठादार देश म्हणून झाली. केंद्र सरकारकडून सातत्याने या गोष्टीचा पुनरुच्चार करण्यात येत असताना काँग्रेसकडून यावर तीव्र शब्दांमध्ये टीका करण्यात आली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असून यादरम्यान देशातील करोनाच्या परिस्थितीवर चर्चा करत असताना काँग्रेस खासदार आनंद शर्मा यांनी राज्यसभेमध्ये या मुद्द्यावरून मोदी सरकारला परखड शब्दांमध्ये सुनावलं आहे. “देशात सरकार पंडित जवाहरलाल नेहरू यांचं असो किंवा मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं असो, प्रत्येक सरकारचं एक कर्तव्य आहे”, असं ते म्हणाले.

 

फक्त आकडेवारीवर वाद घालणं चुकीचं

राज्यसभेमध्ये देशातील करोनाची परिस्थिती आणि केंद्र सरकारची कामगिरी यासंदर्भात चर्चा सुरू असताना काँग्रेस उपनेते आणि राज्यसभा सदस्य आनंद शर्मा यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि केल्या जाणाऱ्या चर्चांवर बोट ठेवलं. “आपल्याला तथ्यांवर बोललं पाहिजे, फक्त आकडेवारीवर वाद घालणं चुकीचं आहे. आपल्या देशातील वैज्ञानिक, डॉक्टर, पॅरामेडिक्स आणि औषध निर्मात्यांवर आम्हाला गर्व आहे. सर्व भारतीयांना गर्व आहे. पण मी एक गोष्ट इथे स्पष्ट करतो. भारत काही आज औषध निर्मितीबद्दल जगभरात नावाजलेला नाही. ९० च्या दशकामध्ये भारत जगभरातला सर्वाधिक औषध निर्मिती करणारा देश बनला होता”, असं ते यावेळी म्हणाले.

 

इथपर्यंत येण्यासाठी अनेक दशकं लागली आहेत

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारला आपल्या जबाबदारीची आठवण देखील करून दिली. “भारताला औषध निर्मितीच्या बाबतीत आजच्या परिस्थितीत येण्यासाठी स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांचा कालावधी लागला आहे. सिरम इन्स्टिट्युट कोणत्या वर्षी स्थापन झाली? १९६० च्या दशकात. पहिली व्हॅक्सिन इन्स्टिट्युट कधी स्थापन झाली? सरकारांना आपापली जबाबदारी असते. मग ते पंडित जवाहरला नेहरू यांचं सरकार असो किंवा मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच. प्रत्येक सरकारला आपापली कर्तव्य असतातच”, असं ते म्हणाले.

“पंतप्रधानांनी जबाबदारी घेण्याऐवजी आरोग्यमंत्र्यांना बळीचा बकरा बनवलं”

ही राजकारण करण्याची वेळ नाही

आनंद शर्मा यांनी केंद्र सराकारला यावेळी सल्ला देखील दिला. “ही राजकारण करण्याची वेळ नाही, तर एकजूट दाखवण्याची वेळ आहे. कारण आपण पाहिलं आहे की देशाच्या राजधानीमध्ये सामान्य नागरिकांसोबतच डॉक्टरांचा देखील करोनामुळे मृत्यू झाला आहे आपल्याला लोकांना वाचवण्याविषयी, पुढची करोना लहर कधी येईल त्याविषयी बोललं पाहिजे, तरच आपण त्यापासून वाचू शकतो”, असं देखील आनंद शर्मा यांनी यावेळी नमूद केलं.