Congress MP Priyanka Gandhi Vadra on Removal of Jailed PM CMs : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज (२० ऑगस्ट) लोकसभेत तीन महत्त्वाची विधेयके मांडली. गंभीर गुन्ह्यांच्या आरोपांप्रकरणी अटक झाल्यास किंवा पोलिसांनी ताब्यात घेतल्यास पंतप्रधानांपासून ते राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री आणि जम्मू-काश्मीरसह सर्व केंद्रशासित प्रदेशांच्या मंत्र्यांना पदच्युत करण्याची तरतूद या विधयेकांमध्ये करण्यात आली आहे. विधेयकातील प्रस्तावित तरतुदींनुसार, जर एखादा मंत्री गंभीर गुन्ह्याच्या (पाच वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षेचे गुन्हे) प्रकरणात सलग ३० दिवस तुरुंगात असेल तर राष्ट्रपती हे पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार त्याला पदावरून हटवू शकतील. मात्र, या विधेयकांना विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला आहे.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांनी या विधेयकांना क्रूर म्हटलं आहे. प्रियांका यांनी काही वेळापूर्वी संसद परिसरात प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्या म्हणाल्या, “मी या विधेयकांना पूर्णपणे क्रूर मानते. कारण ही विधेयके प्रत्येक गोष्टीच्या, लोकशाहीच्या विरोधात आहेत. सरकारमधील लोक या विधेयकांना भ्रष्टाचारविरोधातील उपाय म्हणत असले तरी हे जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासारखं आहे.”
लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न : प्रियांका गांधी
प्रियांका गांधी-वाड्रा म्हणाल्या, “उद्या तुम्ही एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोणताही खटला दाखल करू शकता. दोष सिद्ध न होता वेगवेगळ्या मार्गांनी तुम्ही त्या मुख्यमंत्र्यांना ३० दिवसांसाठी तुरुंगात डांबून ठेवाल आणि मग ती व्यक्ती मुख्यमंत्रिपदी राहू शकणार नाही. हा सगळा संविधानविरोधी प्रकार आहे. याद्वारे लोकशाहीची हत्या केली जाईल. हे सगळं खूप दुर्दैवी आहे.”
लोकसभेत विधेयक सादर होताच विरोधी खासदारांकडून गदारोळ
अमित शाह यांनी हे विधेयक लोकसभेत सादर करताच विरोधी पक्षांच्या खासदारांनी याला कडाडून विरोध करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. याचबरोबर काही खासदारांनी या विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी विधेयकाच्या प्रती फाडत गृहमंत्री अमित शाह यांच्या दिशेने फेकल्या. यानंतर लोकसभेचे कामकाज स्थगित करण्यात आलं.
सदर विधेयकाला विरोध करताना काँग्रेस खासदार मनीष तिवारी म्हणाले, “हे विधेयक संविधानाच्या मूलभूत रचनेचा पूर्णपणे नाश करणारं आहे. त्यामुळे आम्ही त्यास विरोध करत आहोत. या विधेयकामुळे सरकारी यंत्रणांच्या गैरवापराला आणखी चालणा मिळणार आहे.”