Shashi Tharoor On India-Pakistan Handshake Contreversy In Asia Cup: पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर झालेल्या लष्करी संघर्षामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशात सध्या सुरू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानबरोबर झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाच्या या निर्णयाशी काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी असहमती दर्शवली आहे.
“जर आपल्याला पाकिस्तानचा विरोध करायचा होता, तर आपण त्यांच्याबरोबर खेळायलाच नको होते. पण जर आपण त्यांच्याशी खेळत असू, तर आपण खेळाच्या भावनेने खेळायला हवे आणि त्यांच्याशी हस्तांदोलन करायला हवे”, असे शशी थरूर म्हणाले.
यावेळी शशी थरूर यांनी १९९९ च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याचा उल्लेख केला, जेव्हा कारगिल युद्धादरम्यानही दोन्ही संघांनी मैदानावर हस्तांदोलन केले होते.
“ज्या दिवशी आपल्या देशासाठी जवान शहीद होत होते, त्याच दिवशी आपण इंग्लंडमध्ये पाकिस्तानविरुद्ध विश्वचषक खेळत होतो. तेव्हाही आपण हस्तांदोलन केले होते, कारण खेळाची भावना देश, सैन्य आणि इतर गोष्टींपेक्षा वेगळी असते, असे माझे मत आहे”, असे थरूर म्हणाले.
दोन्ही संघांच्या प्रतिक्रियांवरून त्यांच्यात खेळाच्या भावनेचा अभाव असल्याचे दिसून येते, असेही थरूर यांनी नमूद केले. “पहिल्यांदा अपमानित झालेल्या पाकिस्तानी संघाने दुसऱ्यांदा आपला अपमान करण्याचा निर्णय घेतला असेल, तर हे दर्शवते की दोन्ही संघांमध्ये खेळाच्या भावनेचा अभाव आहे”, असे ते म्हणाले.
आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ सप्टेंबर रोजी गट फेरीत पहिल्यांदा सामना झाला होता. यामध्ये भारतीय संघाने विजय मिळवला होता. या विजयानंतर दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर विरोधी संघाशी नेहमीप्रमाणे हस्तांदोलन न करता कर्णधार सूर्यकुमार यादवने शिवम दुबेसह मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता. तत्पूर्वी नाणेफेकीवेळीही सूर्यकुमारने पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केले नव्हते.
सामन्यानंतर झालेल्या पुरस्कार समारंभात, भारतीय कर्णधार सूर्यकुमारने पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना आणि भारतीय सशस्त्र दलांना हा विजय समर्पित केला होता.
२१ सप्टेंबर रोजी दुबई येथे झालेल्या सुपर ४ फेरीतील सामन्यात भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव केला होता. तेव्हाही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नव्हते.
दरम्यान, भारतीय संघाने आधीच आशिया चषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून, गुरुवारी होणाऱ्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशला हरवल्यास त्यांचा पुन्हा एकदा भारताशी सामना होऊ शकतो.