घराणेशाहीचे राजकारण भारतीय लोकशाहीसाठी गंभीर धोका आहे, असे मत काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी व्यक्त केले. जेव्हा राजकीय सत्ता ही क्षमता, वचनबद्धता किंवा तळागाळातील लोकांच्या सहभागापेक्षा वंशाने ठरवली जाते तेव्हा प्रशासनाची गुणवत्ता खालावते.
नेहरू-गांधी कुटुंब हे काँग्रेसशी संबंधित आहे. राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घराणेशाही आहे, असे थरूर यांनी आंतरराष्ट्रीय माध्यम संस्था असलेल्या ‘प्रोजेक्ट सिंडिकेट’साठी लिहिलेल्या लेखात नमूद केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सरकारच्या परराष्ट्र धोरणाबाबत अनुकूल भाष्य करणाऱ्या थरूर यांच्या या मतांकडे काँग्रेस श्रेष्ठींशी निर्माण झालेल्या दुराव्यातून पाहिले जाते.
‘इंडियन पॉलिटिक्स आर ए फॅमिली बिझनेस’ या शीर्षकाखालील लेखात अनेक दशके एकाच कुटुंबाचा भारतीय राजकारणावर दबदबा राहिला हे स्पष्ट करताना, “नेहरू-गांधी घराण्याचा प्रभाव हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाशी जोडलेला आहे. राजकीय नेतृत्व हा जन्मसिद्ध हक्क असू शकतो ही कल्पनाही दृढ झाली आहे. ही कल्पना भारतीय राजकारणात प्रत्येक पक्षात, प्रत्येक प्रदेशात आणि प्रत्येक स्तरावर शिरली आहे,” असे थरूर यांनी नमूद केले आहे.
घराणेशाहीतून राजकारणात वारसदार पुढे येणे हे सार्वकालिक आहे, असे लिहिताना थरूर यांनी बिजू जनता दल, शिवसेना, समाजवादी पक्ष, लोकजनशक्ती पक्ष, द्रमुक, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी या पक्षांची उदाहरणे दिली. भारतीय उपखंडातही अशा घराणेशाहीचे राजकारण चालते हे स्पष्ट करताना पाकिस्तानातील भुट्टो आणि शरीफ, बांगलादेशातील शेख आणि झिया कुटुंबे आणि श्रीलंकेतील बंदरनायक आणि राजपक्षे यांची उदाहरणे दिली.
भारताच्या लोकशाहीशी हे विसंगत दिसते. मग भारताने घराणेशाहीचे हे प्रारूप इतके पूर्णपणे का स्वीकारले आहे? एक कारण म्हणजे कुटुंब एक नाममुद्रा म्हणून प्रभावीपणे काम करू शकते. उमेदवारांना मतदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी कष्ट करावे लागत नाहीत. जर मतदारांनी उमेदवाराच्या घराण्यातील व्यक्तीला यापूर्वी निवडून दिले असेल तर पुढील पिढीलाही ते स्वीकारतील त्यासाठी विश्वासार्हता निर्माण करण्याची आवश्यकता नाही, असे थरूर यांनी लेखात म्हटले आहे.
