scorecardresearch

काय वेळ आलीय? सुभाषचंद्रांनी नेहरूंना लिहिलेलं पत्र शेअर करत शशी थरूर म्हणाले…

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांना लिहिलेलं एक पत्र ट्वीट केलंय.

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांना लिहिलेलं एक पत्र ट्वीट केलंय. हे पत्र ट्वीट करताना शशी थरूर यांनी ‘आपले राजकीय नेते वाचायचे, लिहायचे, विचार करायचे आणि एकमेकांची काळजीही करायचे. तेव्हापासून आजपर्यंत आपण किती खालच्या पातळीवर आलोय?’ असं मत व्यक्त केलंय.

शशी थरूर यांनी ट्वीट केलेल्या सुभाषचंद्र बोस यांचं हे पत्र ३० जून १९३६ रोजी दार्जिलिंगच्या पोलीस अधीक्षकांच्या घरून लिहिलेलं आहे. सुभाषचंद्र बोस यांनी या पत्रात लिहिलं आहे, “प्रिय जवाहर, तुमचं पत्र मिळालं. तुम्ही खूप जास्त प्रमाणात काम करत आहात असं मला समजलं. मला तुमच्या प्रकृतीविषयी काळजी वाटते आहे. मात्र, मला याचा आनंद आहे की तुम्ही थोड्या वेळासाठी का होईना पण काम थांबवून मसूर येथे विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला.”

“तुम्ही स्वतःला फार ताणू नका, जर तुमची प्रकृती बिघडली तर…”

“मला याची कल्पना आहे की अधिकचं काम टाळणं तुमच्यासाठी किती कठीण असेल. त्यासाठी मी तुमचं कौतुक करतो. मात्र, तुम्ही स्वतःला फार ताणू नका. जर तुमची प्रकृती बिघडली तर यामुळे कोणालाही मदत होणार नाही. तुम्ही तुमचा मेव्हुणा रणजीतबद्दल जे सांगितलं ते ऐकून खूप दुःख झालं. असं असलं तरी डॉक्टरांनी अद्याप कोणताही गंभीर धोका नसल्याचं म्हटलंय हा काहिसा दिलासा आहे. बदल आणि आराम त्याला बरं व्हायला मदत करेल अशी आशा करुयात,” असं म्हणत त्यांनी नेहरू आणि त्यांच्या मेव्हुण्याच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त केली.

“मला घशाच्या संसर्गामुळे ताप आलाय”

नेहरूंनी बोस यांना लिहिलेल्या पत्रात त्यांच्या तब्येतीची विचारपुस केली होती. त्याला उत्तर देताना सुभाषचंद्र बोस म्हणाले, “मी इथं चांगला आहे. माझ्या आतड्यांना केवळ थोडा त्रास आहे. तसेच मला घशाच्या संसर्गामुळे ताप आलाय. मात्र, वेळ जाईल तसा हा तापही जाईल.”

हेही वाचा : नरेंद्र मोदींचा ‘मैं, मैं, मैं’चा जप २०२४ लोकसभा निवडणुकीत निरुपयोगी, कारण…: शशी थरूर

“तुमच्या ग्रंथालयात खालीलपैकी कोणतीही पुस्तकं असतील तर एक किंवा दोन पुस्तकं मला पाठवाल,” असं म्हणत सुभाषचंद्र बोस यांनी नेहरूंना लिहिलेल्या पत्रात ८ पुस्तकांची नावं लिहिली होती.

पत्रातील ८ पुस्तकं कोणती?

१. हिस्टॉरिकल जिओग्राफी ऑफ युरोप
२. क्लॅश ऑफ कल्चर अँड कॉन्टॅक्ट ऑफ रेसेस
३. शॉर्ट हिस्टरी ऑफ आवर टाईम्स
४. वर्ल्ड पॉलिटिक्स१९१८-३५
५. सायन्स अँड द फ्युचर
६. अफ्रिका व्ह्युव
७. चंघीस खान
८. द ड्युटी ऑफ एम्पायर

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress mp shashi tharoor tweet subhash chandra bose letter to jawaharlal nehru pbs

ताज्या बातम्या