‘हिंदूत्ववादी विचारांनी निर्माण केलेले नेताजींचे खोटे चित्र तपासून घेण्याची’-  कुरुंदकरांची इच्छा पूर्ण करणे, ही ‘इतिहासातील चुकांची दुरुस्ती’ ठरेल..

राजधानी दिल्लीत राजपथावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. रविवारी, २३ जानेवारी रोजी नेताजींच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जन्मदिनाचे औचित्य साधून पंतप्रधानांनी ही घोषणा केली. या वेळच्या भाषणात त्यांनी ‘काही ऐतिहासिक चुका’ दुरुस्त केल्या जात असल्याचे सांगितले. त्याचेही स्वागत. या दुरुस्तीची गरज होती. ‘नेताजी बोस हे पं. नेहरू यांचे प्रतिस्पर्धी होते आणि त्यामुळे पं. नेहरू यांना त्यांच्याविषयी आकस होता; तसेच ते गांधी आणि गांधीविचारांचेही विरोधक होते’ असे मानण्याची प्रथा असल्याने पं. नेहरू आणि महात्मा गांधी या दोहोंचे टीकाकार असलेले नेताजींस आपले मानतात.  वास्तव तसे अजिबात नाही. ‘‘हिंदूत्ववादी विचारांनी निर्माण केलेले नेताजींचे खोटे चित्र तपासून घेण्याची आता वेळ आली आहे,’’ अशी इच्छा नरहर कुरुंदकर यांनी १९७२ साली नेताजींच्या अमृतमहोत्सवी जन्मदिनी व्यक्त केली होती. आज ५० वर्षांनंतर पंतप्रधान मोदी त्या दिशेने पाऊल टाकताना दिसतात. तसे करत असताना कोलकात्याच्या ‘नेताजी सुभाषचंद्र बोस प्रतिष्ठान’ने प्रकाशित केलेल्या नेताजींच्या १२ खंडी चरित्राचे पंतप्रधानांनी निश्चितच अवलोकन केले असणार. ज्या काँग्रेसवर नेताजींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सोयीस्करपणे काही विचारधारा सातत्याने करीत असतात त्या काँग्रेसच्या सर्वात प्रबळ नेत्या तसेच पं. नेहरू यांची कन्या इंदिरा गांधी यांच्या सरकारने या इतिहास प्रकाशनास सक्रिय मदत केली होती आणि त्यांच्याच पंतप्रधानपदाच्या काळात त्यांच्याच हस्ते नेताजींच्या चरित्रांचा पहिला खंड प्रकाशित झाला. तेव्हा या ढळढळीत सत्याच्या प्रकाशात ‘ऐतिहासिक चुका दुरुस्ती’च्या प्रयत्नांचा आढावा घ्यायला हवा. नेताजींचा जन्म श्रीमंत म्हणावे अशा घरातला. शिक्षण मिशनरी शाळेत. पुढे उच्चशिक्षणासाठी केम्ब्रिजला दाखल झाल्याने आपले ‘वेदांताच्या ‘माया’वादी अन्वयार्थावर विश्वास ठेवणे’ थांबले असे त्यांनीच लिहून ठेवले आहे. त्याआधी भारतातील महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर त्यांनी बनारस, हरिद्वार, मथुरा, वृंदावन अशा तीर्थस्थळांस भेट दिली होती. या धर्मस्थळांचा बकालपणा आणि पंडे आदींचा उच्छाद याचे अनुभवही त्यांनीच लिहून ठेवलेले आहेत. पुढे ‘आयसीएस’च्या परीक्षेत सुभाषबाबू चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले असता ब्रिटिश सरकारची चाकरी करणे त्यांनी नाकारले आणि ऑक्सफर्डला काही आठवडे व्यतीत करून ते भारतात परतले. १६ जुलै १९२१ रोजी मुंबईत उतरल्यावर त्यांनी पहिली भेट घेतली ती महात्मा गांधी यांची. पुढे स्वातंत्र्यलढय़ाची दिशा काय असावी याबाबत त्यांचे गांधी यांच्याशी मतभेद झाले. पण राजकारणात गांधी, चित्तरंजन दास आणि पं. नेहरू ही त्यांची कायमची आदरस्थाने होती. त्यांच्या ‘आझाद हिंदू सेने’त गांधी आणि नेहरू यांच्या नावाच्या तुकडय़ा होत्या यावरून त्यांचा या दोघांविषयी असलेला आदर लक्षात यावा.

chaturang nature disorder harmful to society Personality American Psychological Association
स्वभाव-विभाव: समाजासाठी विघातक विकार
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Mahayuti, Shinde group leader,
महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता, शिंदे गटाच्या नेत्याचे भाकित
Nitish Kumar
नितीश कुमारांना ‘एनडीए’शी प्रामाणिक असण्याबाबत का वारंवार द्यावं लागतंय स्पष्टीकरण? ‘त्या’मागचं राजकारण काय?
Where are the modern Indian political thinkers says Yogendra Yadav
आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत आहेत कुठे?
article about president droupadi murmu expresses concern over rising crimes against women
महिला अत्याचारांचे राजकारण होतच राहील…
Indian society, Ramayana, Mahabharata, positive ideals, negative tendencies, Rama, Krishna, Ravana, Duryodhana, social consciousness, judicial system, cultural influence,
रावणाच्या मर्यादांची प्रतिष्ठापना आज आवश्यक आहे…
Badlapur sexual assault case,
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण: आरोपीच्या चारित्र्याविषयी माहिती गोळा करण्याचे काम सुरू

नेताजी आणि आजचा भारत

अशीच आवर्जून लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे नेताजींचे मुसलमानांविषयीचे औदार्य. नेताजी ज्यांचे चिटणीस म्हणून काम करत होते त्या चित्तरंजन दास यांनी बंगालसाठी स्वतंत्र करार करून तेथील ५२ टक्के मुसलमानांस ६० टक्के जागा आणि ५५ टक्के नोकऱ्या देण्याचा प्रस्ताव काँग्रेससमोर ठेवला. तो काँग्रेसने अमान्य केला. कारण इतके औदार्य गांधीजींस मान्य नव्हते. हे मुसलमानविषयक औदार्य हा नेताजींच्या राजकारणाचा स्थायिभाव. त्यामुळेच पुढे काँग्रेसच्या अध्यक्षपदी आल्यावर त्यांनी ‘मुस्लीम लीग’शी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर मुंबईत महंमद अली जिना यांचीही भेट घेतली. नेताजींचे मूळ बंगालचा मुसलमान-बहुल प्रांत. तेव्हा त्या प्रांतातील नेतृत्वास मुसलमानांविषयी सहानुभूती असणे नैसर्गिक आणि आवश्यक दोन्हीही होते, हे लक्षात घ्यायला हवे. या पार्श्वभूमीवर नेताजींस गांधीविरोधी मानण्याचा आणि जे जे गांधी/नेहरूविरोधी ते ते हिंदूुत्ववादी समर्थक असे मानण्याचा पडलेला प्रघात किती चुकीचा आहे याचे आकलन होईल. पंतप्रधान मोदी यांस अभिप्रेत असलेली इतिहासातील चुकांची दुरुस्ती ती बहुधा हीच असावी.

“इंडिया गेट येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवणार”, पंतप्रधान मोदींची घोषणा

बोस यांनी ‘फॉरवर्ड ब्लॉक’ची स्थापना करणे आणि इंग्रजांविरोधात सशस्त्र क्रांतीची भाषा करणे या दोन घटनांचा चतुर वापर काहींकडून त्यांना ‘आपले’ ठरवण्याच्या प्रयत्नात केला जातो. म्हणजे पं. नेहरू यांस कंटाळून त्यांनी काँग्रेस सोडली आणि गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानास विरोध म्हणून त्यांनी ‘आझाद हिंदू सेना’ स्थापन केली, असे या अशा मंडळींचे मानणे. ते इतिहासाचे सुलभीकरण झाले. वास्तव तसे नाही. सुभाषचंद्रांनी ‘फॉरवर्ड ब्लॉक’ची स्थापना केली हे खरे असले तरी म्हणून त्यांनी शेवटपर्यंत काँग्रेसचा त्याग केला नव्हता, हेही तितकेच खरे आहे. नंतर त्यांनी काँग्रेसचा स्वातंत्र्यलढय़ातील मार्ग सोडून वेगळा रस्ता चोखाळला हे खरे. त्यासाठी अफगाणिस्तान, रशियामार्गे ते जर्मनी आणि जपानला गेले हे खरे. यातूनच १९४३ साली त्यांनी स्वतंत्र भारताचे हंगामी सरकार स्थापन केले. पण त्यांच्या या प्रतिसरकारचा ध्वज काँग्रेसचा चरखाधारी तिरंगा हाच होता, भगवा नव्हे, हेही खरे. ही बाब ऐतिहासिक चुका दुरुस्तीत महत्त्वाची. इतकेच काय पण सुभाषचंद्रांनी आपल्या कार्यकर्त्यांस पुढे सल्ला दिला तो भारतात जाऊन काँग्रेस नेतृत्वाखाली देशसेवा करण्याचा. हे सर्व होत असताना पं. नेहरू आणि महात्मा गांधी हे दोघेही हयात होते. इतकेच नव्हे तर आझाद हिंदू सेनेच्या युद्धकैद्यांच्या मुक्ततेसाठी प्रयत्न करणारी काँग्रेसच होती आणि त्या वेळी सुभाषबाबूंचे बंधू शरद बोस हेदेखील काँग्रेसमध्येच होते. त्यामुळे नेताजी बोस आणि पं. नेहरू- गांधी यांचे संबंध तणावाचे होते ही केवळ लोणकढी वा प्रचाराचा भाग ठरतो. इतिहास नव्हे. हा गैरसमज दूर करणे हेच पंतप्रधानांसही अभिप्रेत असावे.

नेताजी फाइल्स : एका षड्यंत्र सिद्धान्ताची शोधयात्रा

नेताजींचा पुतळा उभारला जात असताना आणखी एका ऐतिहासिक सत्याचे स्मरण आवश्यक. ते म्हणजे विद्यमान सरकारच्या टीकेची धनी झालेली पं. नेहरू यांची अर्थनीती. प्रत्यक्षात ते धोरण एकटय़ा नेहरू यांचे नव्हते. स्वातंत्र्योत्तर भारताच्या अर्थधोरण ठरावाचा मसुदा काँग्रेसतर्फे तयार करण्यात पं. नेहरू आणि नेताजी बोस हे दोघेही एकत्र होते आणि या दोघांनीच हा ठराव मांडला. काँग्रेसचे अध्यक्षपद पं. नेहरू यांच्याकडे दिले जावे यासाठी आग्रही असणाऱ्यांत नेताजी बोस आघाडीवर होते आणि त्याची परतफेड पं. नेहरूंनी पुढे बोस यांना अध्यक्षपदासाठी पाठिंबा देऊन केली. सुभाषचंद्रांसाठी पं. नेहरू हे नेहमीच मार्गदर्शक आणि आदरणीय होते. या ‘खऱ्या’ इतिहासाचे गोविंदराव तळवलकर, नरहर कुरुंदकर यांनी केलेले तपशीलवार विवेचन अनेकांस स्मरत असेल. कुरुंदकर तर ‘‘पं. नेहरू हे सुभाषचंद्रांकडे आपले प्रतिस्पर्धी म्हणून पाहात ही उत्तरकालीनांनी मारलेली सोयीस्कर थाप आहे,’’ इतक्या थेटपणे वास्तव नमूद करतात. याचा अर्थ तत्कालीन काँग्रेस नेत्यांत सर्व काही आबादीआबाद होते असे अजिबात नाही. त्यांच्यात मतभेद होते. पण ते स्वातंत्र्य चळवळीची दिशा, मार्ग आणि गती याचबाबत. महात्मा गांधी यांचे नेतृत्व आणि पं. नेहरू यांची राष्ट्रव्यापी लोकप्रियता ही सर्वास मान्य होती. यात नेताजी सुभाषचंद्र बोस हेदेखील आले. आज अनेकांस ठाऊक नसेल पण मोहनदास करमचंद गांधी यांस ‘राष्ट्रपिता’ ही उपाधी देणारे नेताजी  होते. तेव्हा राजपथावर बोस यांचा पुतळा उभारला जात असेल तर तो इतिहासातील सुभाषचंद्र बोस या प्रतिभावान नेत्याच्या गांधीप्रेमाचाच तो गौरव ठरतो. भाजपप्रणीत सरकारकडून तो होणे हे अधिकच सूचक. पंतप्रधानांस अपेक्षित असलेल्या इतिहासातील चुकीच्या दुरुस्तीचा हा अर्थ अधिक बरोबर.