राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधकांच्या मतांत फाटाफूट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमध्ये मतांच्या फाटाफुटीचा खेळ रंगण्याचा अंदाज खरा ठरला असून महाराष्ट्र, गुजरात, पष्टिद्धr(१५५)म बंगाल, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि गोव्यामध्ये विरोधकांची मते फुटल्याचे उघड झाले. यामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पष्टिद्धr(१५५)म बंगालमधील आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या गुजरात काँग्रेसमधील फाटाफूट आश्र्च्र्याचा सर्वाधिक धक्का देणारी आहे.

महाराष्ट्रात सुमारे दहा ते बारा, गोव्यात ४ ते ५, उत्तर प्रदेशात दहा ते बारा, प. बंगालमध्ये सुमारे पंधरा, गुजरातमध्ये अकरा आणि दिल्लीमध्ये सुमारे आठ मते फुटली किंवा बाद झाली. या निवडणुकीत पक्षादेश जारी करता येत नसल्याने खासदार, आमदारांना स्वत:च्या सद्सदविवेकबुद्धीने मतदान करण्याची मुभा असते. त्याचा फायदा घेऊन भाजपने अपक्ष व छोटय़ा पक्षांची रसद मिळवितानाच विरोधकांमधील असंतुष्टांना हाताशी धरल्याचे दिसते आहे.

ममतांबद्दलची नाराजी?

ममतांच्या बंगालमध्ये भाजप व त्याचा मित्रपक्ष गुरखा जनमुक्ती मोच्र्याकडे प्रत्येकी तीन अशी सहा मते आहेत. पण भाजपला अकरा मते पडली. शिवाय दहा मते बाद झाली. थोडक्यात विरोधी पक्षांच्या नेत्या मीराकुमारांच्या हातातून हक्काची पंधरा मते (२२६५ मूल्य) निसटली. डाव्यांची मते फुटण्याची शक्यता दुर्मिळ मानली जात असल्याने फुटीर मते तृणमूल की काँग्रेसची असल्याबद्दल चांगलेच गूढ निर्माण झाले.

गुजरातमध्ये लाथाळ्यांचा फटका

गुजरातमध्ये भाजपकडे ११६ आमदार आहेत; पण मते पडली १३२. याउलट काँग्रेस आमदारांची संख्या साठ असताना मीराकुमारांना फक्त ४९ मते मिळाली. म्हणजे काँग्रेसच्या अकरा आमदारांची मते फुटली. प्रदेशाध्यक्ष भारतसिंह सोलंकी व माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेलांमधील तीव्र मतभेदांचे रूपांतर या फाटाफुटीत झाल्याचे मानले जात आहे.

आपमधील धुसफूस उघड

दिल्लीमध्ये ७०पैकी ६६ आमदार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आहेत. त्यांनी मीराकुमारांना पाठिंबा दिला असतानाही कोविंद यांना सहा मते मिळाली आणि सहा मते चक्क बाद ठरली. भाजपला मिळालेली दोन ज्यादा मते ही केजरीवालांविरुद्ध आग ओकणारे माजी मंत्री कपिल मिश्रा व भाजपमध्ये नुकतेच आलेले ‘आप’चे आमदार वेदप्रकाश यांची असण्याची शक्यता आहे. पण बाद झालेली सहा मते केजरीवालांना चिंतेत पाडणारी ठरू शकतात.

गोव्यात पाय आणखी खोलात

गोव्यात पाच आमदारांची मते फुटण्याचा प्रकार म्हणजे काँग्रेसला लागोपाठ बसलेला हा दुसरा धक्का आहे. काँग्रेसकडे सोळा आमदार असताना मीराकुमारांना फक्त ११ मते पडली. काँग्रेसच्या पाच आमदारांनी भाजपला मतदान केल्याचे दिसते आहे.

कुटुंबकलहाचे पडसाद

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाची मते फुटणार असल्याचे उघडच होते. भाजपला दहा मते अतिरिक्त मिळाली आहेत. ती समाजवादी पक्षातील मुलायमसिंह, त्यांचे बंधू शिवपालसिंह यांच्या गटाची असल्याची मानली जात आहेत. खुद्द शिवपालसिंह यांनी तसेच उघडपणेच सांगितले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress party in gujarat and goa
First published on: 21-07-2017 at 01:51 IST