उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. मात्र, असं असताना राज्यात वेगवेगळी गुन्ह्याची प्रकरणं समोर येऊ लागली आहेत. दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या अमेठीमधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे उत्तर प्रदेशमधलं वातावरण तापलं असून आता त्यावरून विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनं देखील राज्य सरकारवर तीव्र टीका सुरू केली आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ काँग्रेस नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी ट्वीटरवर शेअर केला असून गुन्हेगारांवर कारवाईची मागणी केली आहे.

प्रियांका गांधींनी दिला २४ तासांचा अल्टिमेटम!

दरम्यान, आपल्या ट्वीटमध्ये प्रियांका गांधींनी सरकारला २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. “अमेठीमध्ये दलित मुलीला निर्दयपणे मारहाण झाल्याचा हा प्रकार निंदनीय आहे. योदी आदित्यनाथजी, तुमच्या राज्यात दररोज दलितांच्या विरोधात सरासरी ३४ तर महिलांच्या विरोधात १३५ गुन्ह्यांची नोंद होत आहे. तरीदेखील तुमची कायदाव्यवस्था झोपली आहे”, असं या ट्वीटमध्ये प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत.

“जर २४ तासांच्या आत या अमानवी कृत्य करणाऱ्या अपराध्यांना अटक केली नाही, तर काँग्रेस पक्षाकडून जोरदार आंदोलन करून तुम्हाला जागं करण्याचं काम केलं जाईल”, असं देखील त्या म्हणाल्या आहेत.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

प्रियांका गांधींनी शेअर केलेल्या व्हिडीमध्ये दोन व्यक्ती एका मुलीला खाली पाडून तिला मारहाण करताना दिसत आहेत. काही व्यक्ती मोबाईलद्वारे या धक्कादायक प्रकाराचं व्हिडीओ शूटिंग देखील करत आहेत. तर काही महिला मारहाण करणाऱ्यांच्या कृत्याचं समर्थन देखील करत आहेत. न्यूज १८ नं दिलेल्या वृत्तानुसार व्हिडीओमध्ये पलंगावर बसलेली व्यक्ती म्हणजे जिलाबदरमधला कुख्यात गुन्हेगार सूरज सोनी असून मुलीला मारहाण करणारा शुभम उर्फ शाकाल त्याचा साथीदार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

का केली मारहाण?

मोबाईल चोरीच्या प्रकरणावरून ही मारहाण झाल्याचं सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी सूरज सोनीच्या घरातून एक मोबाईल चोरी झाला होता. या मुलीनेच मोबाईल चोरी केल्याचा आरोप करत तिला मारहाण करण्यात आल्याचं वृत्त न्यूज १८ नं दिलं आहे.