आसाममध्ये गोलपाडा येथे सर्वात मोठी स्थानबद्धता छावणी (डिटेंशन सेंटर) निर्माण केली जात असून यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत खोटं बोलत असल्याचा आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत बोलताना कुठेही स्थानबद्धता छावणी उभारली जात नसून काँग्रेस करत असलेले आरोप खोटे असल्याचा दावा केला होता. राहुल गांधी यांनी बीबीसीने स्थानबद्धता छावणीसंबंधी केलेला रिपोर्ट शेअर करत मोदींवर टीका केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) पंतप्रधान भारतमातेशी खोटं बोलत आहेत अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय नागरिक नोंदणीबाबत (एनआरसी) संसद, मंत्रिमंडळात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे रविवारी दिल्ली येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले होते. मात्र प्रत्यक्षात आसाम येथील गोलपाडा येथे सर्वात मोठी स्थानबद्धता छावणी निर्माण केली जात असून राज्यातही नवी मुंबईतील नेरुळ येथे एनआरसी कायद्याच्या अंमलबजावणीनंतर स्थानबद्धता छावण्या उभारण्याच्या हालचाली गोपनीय पद्धतीने सुरू असल्याचे समोर आले आहे. आसाममधील स्थानबद्धता छावणीत जवळपास तीन हजार जणांना ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

आणखी वाचा – ‘एनआरसी’ स्थानबद्धता छावणीसाठी जागेची पाहणी

‘एनआरसी’ स्थानबद्धता छावणीसाठी जागेची पाहणी
नवी मुंबईमधील नेरुळ येथे स्थानबद्धता छावणी उभारणीसाठी ऑगस्ट महिन्यात पाहणी करण्यात आली. त्यानंतर गृह विभागाचे सचिव अमिताभ गुप्ता यांनी सिडको मंडळाकडे ३० ऑगस्टला स्थानबद्धता छावणीसाठी जागेची निवड केल्याची माहिती दिली. तसंच सिडको मंडळाकडे संबंधित जागेचा वापर स्थानबद्धता छावणीसाठी करणार असल्याचे सचिव गुप्ता यांच्या लेखी मागणी पत्रात म्हटलं आहे. मात्र ही जागा नेमकी कुठे आहे हे पोलीस विभाग आणि सिडको महामंडळाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी गोपनीय ठेवलं आहे. प्रसारमाध्यमांना याबाबत कोणतीही माहिती मिळू नये याची दक्षता दोन्ही सरकारी विभागांनी घेतली आहे.

विरोधकांकडून टीका
‘एनआरसी’बद्दल राजकीय विरोधक असत्य माहिती पसरवत असून, प्रशासकीय स्तरावर केंद्र सरकारची कोणतीही चर्चा झाली नाही. आसाममध्येच ‘एनआरसी’ राबविण्यात आली होती. देशातील मुस्लिमांना भीतीचे कारण नसल्याचे पंतप्रधान मोदी यांनी रविवारच्या भाषणात स्पष्ट केले होते. त्यामुळे भाजप सरकारच्या कृती आणि उक्तीमध्ये एकवाक्यता नसल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress rahul gandhi pm narendra modi rss nrc assam detention centre sgy
First published on: 26-12-2019 at 11:28 IST