गया (बिहार) : “मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार गुप्ता यांच्या धमकीला आम्ही घाबरत नाही, आम्ही कोणतेही प्रतिज्ञापत्र देणार नाही,” असे प्रत्युत्तर काँग्रेसने सोमवारी दिले. ज्ञानेश कुमार यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सात दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा देशाची माफी मागा असा इशारा दिला होता. त्याला काँग्रेसकडून बिहारमधून उत्तर देण्यात आले.

दिल्लीमध्ये ‘इंडिया’ आघाडी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याच्या पर्यायाचा विचार करत असताना, सोमवारी बिहारमधून राहुल गांधी आणि काँग्रेसने आयोगाविरोधातील आक्रमक हल्लाबोल कायम ठेवला. पक्षाचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषद घेतली. निवडणूक आयोगानेच दिलेल्या कागदपत्रांवर शपथपत्र कशासाठी द्यायचे असा प्रश्न त्यांनी विचारला.

निवडणूक आयुक्तांवर जोरदार टीका करताना खेरा म्हणाले की, “आयुक्त गुप्ता म्हणतात की, सीसीटीव्ही फुटेज दिले तर महिलांचे चरित्रहनन होईल, असले ज्ञान गुप्ता कशासाठी वाटत आहेत, ४९ दिवस फुटेज सुरक्षित ठेवले जाते तेव्हा महिलांचे चरित्रहनन होत नाही का?”

मशीन-रीडेबल माहिती विदा द्यायला विरोध करतानाच, बिहारमधील ६५ लाख वगळलेल्या मतदारांची यादी आयोगाने मशीन रीडेबल स्वरुपात अपलोड केली, ही विसंगती नव्हे का, असा मुद्दा मांडून खेरा यांनी आयोगाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश गुप्ता यांची पत्रकार परिषद म्हणजे टीव्ही वरील निकृष्ट दर्जाची पटकथा होती अशी खिल्ली त्यांनी उडवली.

काँग्रेसचे नेते कन्हैय्याकुमार यांनी बिहारमधील मतदार फेरतपासणी मोहीम म्हणजे संविधान नष्ट करण्याचे कारस्थान असल्याचा आरोप केला. ६५ लाख

मतदारांकडून मतांचा अधिकार काढून घेतला गेला आहे, त्यांना योजनांपासून वंचित ठेवले जाईल, त्यांच्या रोजगाराच्या संधी हिरावून घेतल्या जातील, असा आरोप कन्हैय्याकुमार यांनी केला.

‘आयोगामुळे मोदी, शहा अडचणीत’

राहुल गांधींची ‘व्होटर अधिकार यात्रा’ ही घुसखोरांसाठी काढलेली यात्रा असल्याचा आरोप भाजपने केला. त्यावर, देशात घुसखोरी होत असेल तर हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अपयश असून

त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे प्रत्युत्तर खेरा यांनी दिले. खरेतर केंद्रीय निवडणूक आयोगच शहांना अडचणीत आणत आहे. आयुक्त ज्ञानेश कुमार गुप्ता म्हणतात की, देशात लाखो लोक बेघर आहेत, ही तर मोदी सरकारच्या अपयशाची कबुली ठरते. देशातील गरिबांना घरे देण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते पण आयोग मोदींच्या योजनांमधील फोलपणा उघडा करत आहे, असा टोलाही खेरांनी हाणला.

राहुल, तेजस्वी एकत्र

राहुल गांधींच्या यात्रेमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव दुसऱ्या दिवशीही सहभागी झाले. औरंगाबाद येथून निघालेल्या यात्रेमध्ये तेजस्वी यांनी उपस्थित राहून महागठबंधनच्या एकजुटीचा संदेश दिला. सासाराममध्ये रविवारी झालेल्या जाहीरसभेत लालूप्रसाद यादव यांनी विरोधकांना एकजुटीने विधानसभा लढवण्याचा आवाहन केले होते. त्याचे प्रतिबिंब यात्रेत राहुल- तेजस्वी यांच्या नेतृत्वामुळे उमटलेले दिसले.

मशीन-रीडेबल माहिती विदा देता येणार नाही असे गुप्तांचे म्हणणे होते. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ देत आहेत. हा आदेश कोणती हे तरी सांगा. मशीन रीडेबल माहिती विदा-मतदार यादी भाजपच्या अनुराग ठाकूर यांना कशी दिली जाते, हेही सांगावे. – पवन खेरा, काँग्रेस प्रवक्ते