P Chidambaram Pahalgam Attack Controversy : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला तीन महिने झाले तरी केंद्रातील मोदी सरकार हल्लेखोरांना पकडू शकलेलं नाही. हा हल्ला रोखण्यात व त्यानंतरच्या कारवाईत केंद्र सरकार फोल ठरल्याची टीका होत आहे. या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम हाती घेतली होती. मात्र, भारत-पाकिस्तान संघर्ष सुरू झाल्यानंतर काही तासांनी केंद्र सरकारने ही मोहीम रोखली. लगोलग अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की मी भारत-पाकिस्तानमधील युद्ध रोखलं.
या सगळ्या घटनांनंतर विरोधकांनी पहलगाम हल्ला व ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली. विरोधक गेल्या तीन महिन्यांपासून विशेष अधिवेशनाची मागणी करत आहेत. मात्र, या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केलं. दरम्यान, केंद्र सरकारने आज व उद्या लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात यावर १६ तास चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. या चर्चेला सुरुवात होण्याआधी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चिदंबरम काय म्हणाले?
पी. चिदंबरम यांनी या हल्ल्यावरून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, “राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटवली आहे का? ते दहशतवादी कुठून आले होते? पाकिस्तानातूनच आले होते हे दावे कशावरुन केले जात आहेत? ते पाकिस्तानातून आले असतील तर त्याचे पुरावे काय? कशावरुन ते भारतातच तयार झालेले दहशतवादी नसतील? या हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानशी संघर्ष झाला, त्यादरम्यान झालेलं नुकसान का लपवलं?”
पी. चिदंबरम यांच्यावर भाजपाच्या अमित मालवीय यांची टीका
दरम्यान, भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी यावरून चिदंबरम यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, “पुन्हा एकदा काँग्रेस पाकिस्तानला क्लीन चिट देण्यासाठी पुढे सरसावली आहे. जेव्हा जेव्हा आपलं लष्कर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा सामना करत असतं तेव्हा काँग्रेसचे नेते भारतातील विरोधी पक्षाची भूमिका निभावण्याऐवजी इस्लामाबादची वकिली का करतात? राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर कुठेही अस्पष्टता असू नये. परंतु, काँग्रेस अशी कधीच वागत नाही. काँग्रेस नेहमीच शत्रूच्या रक्षणासाठी पुढे सरसावते, प्रयत्न करते.”
चिदंबरम यांच्या वक्तव्यावर काँग्रेसची भूमिका काय?
दरम्यान, एएनआयशी बातचीत करताना काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी चिदंबरम यांच्या वक्तव्यापासून स्वतःला दूर ठेवलं आहे. तसेच ते म्हणाले की “या विषयावर चिदंबरम हेच अधिक स्पष्टपणे माहिती देऊ शकतील.”