नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यातील मतभेद दूर होत असल्याचे संकेत मिळाले आहेत. काँग्रेसने तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून मान्यता देण्याची तयारी दर्शवली असून, त्यामुळे महाआघाडी मजबूत होण्याची शक्यता आहे. बुधवारी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गहलोत यांनी आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्याचे पुत्र तेजस्वी यादव यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी काँग्रेसचे बिहार प्रभारी कृष्णा अल्लावरुही उपस्थित होते.
या बैठकीनंतर गेहलोत यांनी सांगितले की, महाआघडी एकसंध आहे. लवकरच एकत्रित पत्रकार परिषद घेतली जाईल आणि सर्व संभ्रम दूर होतील.आतापर्यंत जागावाटपावर अंतिम निर्णय झालेला नसतानाही, महाआघडी आता काही जागांवर मैत्रिपूर्ण लढत स्वीकारण्याच्या तयारीत आहे. वैशाली, कहलगाव, नरकटियागंज, सुलतानगंज आणि सिकंदरा या ठिकाणी आरजेडी आणि काँग्रेस दोघेही आपले उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे.राजद कडून तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात तेजस्वी सरकार या संकल्पनेवर भर देण्यात येत असून, काँग्रेसने सुरुवातीला त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी स्पष्ट पाठिंबा न दिल्यामुळे मतभेद निर्माण झाले होते. मात्र आता काँग्रेस यावर माघार घेत असल्याने महाआघाडी अधिक सशक्त होईल, असा विश्वस व्यक्त केला जात आहे.भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांमुळे निवडणुकीला वेग आला आहे. याउलट महाआघाडीकडून अद्याप संयुक्त प्रचाराची घोषणा झालेली नाही.
अशोक गेहलोत यांनी माध्यमांशी बोलताना भाजपवर आरोप केला की, महाआघाडीमध्ये फूट असल्याचा खोटा प्रचार करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न भाजपने केला. मात्र, आता सर्व संभ्रम दूर झाले आहेत.