करोना संकटाच्या काळात भाजपा आणि काँग्रेस टूलकिटवरुन एकमेकांवर टीका करत आहेत. या टूलकिटवरुन आता ट्विटरने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी १८ मे रोजी एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये त्यांनी टूलकिटचा संदर्भ देत काँग्रेसवर आरोप केला होता. आता ट्विटरने या ट्विटला ‘मॅन्युपुलेटेड मीडिया’ (काही विशिष्ट हेतूने बातम्या देणारी प्रसारमाध्यमे) असल्याचे म्हटले आहे. याचाच अर्थ हे तथ्यानुसार खोटं आहे.

संबित पात्रा यांनी १८ मे रोजी एक ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी काँग्रेस पक्ष एका टूलकिटद्वारे करोना संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे. संबित पात्रा यांनी दावा केला होता काँग्रेस टूलकिटच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण करत आहे.

या ट्विटमध्ये एक पत्रक देखील देण्यात आलं होतं. ज्यावर काँग्रेस पक्षाच्या लेटरहेडवर सोशल मीडियावर कशा प्रकारचे ट्विट करायचे आहेत आणि कोणती माहिती वापरायची याबद्दल माहिती होती.

ट्विटरने या ट्विटवर कारवाई करत यामध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे आणि त्याला ‘मॅनिपुलेटेड मीडिया’ म्हटले आहे. ट्विटरच्या धोरणानुसार, ट्विट करत असलेली कोणतीही माहिती जर तिचा स्रोत अचूक नसेल आणि माहिती देखील चुकीची असेल तर त्याला ‘मॅनिपुलेटेड मीडिया’चा टॅग लावला जातो. हा टॅग व्हिडिओ,फोटो किंवा अन्य माहितीवरसुद्धा लावला जाऊ शकतो. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूकीच्या दरम्यान ट्रम्प यांच्या अनेक ट्विटवर हा टॅग लावण्यात आला होता. त्यानंतर ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट कायमचं बंद करण्यात आलं होतं.

दरम्यान, या टूलकिटवरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये मोठा वाद सुरु आहे. भाजपाने केलेले आरोप काँग्रेसने फेटाळून लावले आहेत. राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह पक्षातील अन्य नेत्यांनी भाजपा खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसने दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना यासंदर्भात पत्र लिहीत संबित पात्रा, जे पी नड्डा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.